आता राज्यातच घ्या तंबूत राहण्याचा आनंद; रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर गुजरातची कंपनी उभारणार टेंट सिटी

By नारायण जाधव | Published: October 25, 2023 10:35 AM2023-10-25T10:35:51+5:302023-10-25T10:36:53+5:30

राज्यातच आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. 

now in the state take the joy of living in a tent gujarat company will set up a tent city on the beach of raigad | आता राज्यातच घ्या तंबूत राहण्याचा आनंद; रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर गुजरातची कंपनी उभारणार टेंट सिटी

आता राज्यातच घ्या तंबूत राहण्याचा आनंद; रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर गुजरातची कंपनी उभारणार टेंट सिटी

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : महाराष्ट्रातील नागरिकांना तंबूतील निवासाचा आनंद लुटण्यासाठी आता लेह, लडाख, राजस्थान किंवा कच्छच्या रणात जाण्याची गरज नाही. राज्यातच आता उच्च दर्जाची टेंट सिटी रायगड जिल्ह्यातील किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर बांधण्यात येत आहे. 

राज्याच्या नव्या पर्यटन धोरणांतर्गत एमटीडीसी अर्थात महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाने टेंट सिटी बांधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ‘बांधा-वापरा-संचलन’ तत्त्वावर खासगीकरणातून तिचे काम गुजरातमधील एका कंपनीस दिले आहे.

अलिबागला लागूनच असलेल्या किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर टेंट बांधण्याचे कंत्राट एमटीडीसीने अहमदाबादच्या प्रवेग लिमिटेड या कंपनीस दिले आहे. इकोफ्रेंडली आरामदायी हॉटेल्स आणि टेंटसह रिसॉर्ट बांधण्याचे काम ही कंपनी करते.

किहीमच्या समुद्रकिनाऱ्यावर एमटीडीसीच्या मालकीच्या साडेसहा एकरावर ५ वर्षांत ४० उच्च दर्जाचे आरामदायी टेंट उभारले जातील. तसेच सभागृह, रेस्टॉरंट, डायनिंग एरिया, इनडोअर, आउटडोअर करमणूक उपक्रम, योगा, आयुर्वेदिक उपचार, सांस्कृतिक केंद्र, वैद्यकीय कक्ष असेल.

पर्यटनाला मिळणार चालना

मुंबई आणि पुण्यानजीकचा आणि ऐतिहासिक रायगड किल्ला, मुरुड-जंजिरा किल्ल्यासह कुलाबा, खंदेरी, उंदेरी सारखे अनेक गडकोट असलेला जिल्हा म्हणून रायगड ओळखला जातो. जिल्ह्यात अलिबाग, किहीम, काशीद, मुयड-जंजिरा, श्रीवर्धन-म्हसळासारखी सुंदर बिचेस आहेत. याशिवाय कर्नाळा पक्षी अभयारण्यासह प्राचीन मंदिरे, ज्यू संस्कृतीच्या पाऊलखुणा आणि ब्रिटिशांनी स्थापन केलेली दीडशे वर्षे जुनी भूचुंबकीय वेधशाळेसह नानाविध पर्यटनस्थळे जिल्ह्यात आहेत. बोटीनेही येथे मुंबई, नवी मुंबईतून ये-जा करता येते. रेवस-मांडवाहून मोरा, मुंबई भाऊचा धक्का अशी जलवाहतुकीची सोय येथून आहे. आता याच जिल्ह्यात टेंट सिटी बांधण्यात येत असल्याने जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला आपसूक चालना मिळणार आहे.

 

Web Title: now in the state take the joy of living in a tent gujarat company will set up a tent city on the beach of raigad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड