आता नमुंमपा वाशी सार्वजनिक रुग्णालयात अद्ययावत डायलेसीस सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2023 04:38 PM2023-04-03T16:38:35+5:302023-04-03T16:38:48+5:30
नवी मुंबई -कोविड प्रभावीत कालावधीनंतर डायलेसीस करणे आवश्यक असणा-या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना ...
नवी मुंबई -कोविड प्रभावीत कालावधीनंतर डायलेसीस करणे आवश्यक असणा-या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या दृष्टीने सर्वसामान्य नागरिकांना डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक पाऊले उचलून आपल्या वाशी रुग्णालयासोबतच ऐरोली व नेरुळ रुग्णालयात बाह्य यंत्रणेव्दारे सोमवार पासून डायलेसीस सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
ययामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी सार्वजनिक रुग्णालयात 10 बेड्सची डायलेसीस सुविधा आधीपासूनच उपलब्ध होती. त्यामुळे बदलत्या तंत्रज्ञानानुसार त्यामध्ये अद्ययावत बदल करणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पाटील यांच्यामार्फत सकारात्मक कार्यवाही करण्यात येत होती.
यामध्ये प्राईड इंडिया या सेवाभावी संस्थेच्या सहयोगाने आदित्य बिर्ला कॅपिटल या उद्योग समुहाच्या सीएसआर निधीतून वाशी सार्वजनिक रुग्णालयात असलेल्या 10 बेड्सच्या सुविधेचे अद्ययावतीकरण करण्यात आले असून डायलेसीस मशीन व बेड्सची अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
या डायलेसीस मशीन्स व बेड्स नवी मुंबई महानगरपालिकेचे सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे कार्यान्वित होताना रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अजय गडदे तसेच आदित्य बिर्ला कॅपिटलचे मु्ख्य ह्युमन रिसोर्स अधिकारी सुब्रो बादुरी व सीएसआर प्रमुख. गोपाल कुमार तसेच प्राईड इंडिया संस्थेच्या मुख्य कार्यवाहक श्रीम. इशा मेहरा व इतर मान्यवर उपस्थित होते.
या अत्याधुनिक सुविधेमुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील डायलेसीस आवश्यक असणा-या रुग्णांची चांगली सोय होणार असून याठिकाणी दिवसाला 12 रुग्णांचे हिमोडायलेसीस केले जाऊ शकते. सकाळी 8 ते सायं. 6 या वेळेत प्रतिदिन 12 अशी या डायलेसीस कक्षाची क्षमता असून याव्दारे सर्वसामान्य नवी मुंबईकर रुग्णांना दिलासा लाभला आहे.