नवी मुंबई - मुंबईकरांना थेट कल्याण-डोंबिवलीत विनाविलंब जाता यावे, यासाठी ‘एमएमआरडीए’कडून १४४१.३९ काेटी खर्चाच्या ऐरोली-काटई या १२.३ किमीच्या मार्गाचे काम सध्या जोरात सुरू आहे. मात्र, हा मार्ग नवी मुंबईतून जात असूनही त्याच्या आराखड्यात त्यावर चढ-उतारासाठी मार्गिका नसल्याने नवी मुंबईकरांत तीव्र असंतोष होता. याबाबत नवी मुंबई महापालिकेसह ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनी अनेकदा ‘एमएमआरडीए’सह मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठपुरावा केला. अखेर नवी मुंबईकरांची ही मागणी मान्य झाली असून, या मार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर रस्त्यावरून जोड मार्गिका बांधण्यात येणार आहे. ‘एमएमआरडीए’ने मार्च महिन्यात झालेल्या १५४ व्या बैठकीत यासाठीच्या वाढीव ५३ कोटी ४७ लाख ५१ हजार ८७ रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे.
मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांतील वाहतूक गतिमान व्हावी, २०१४ मध्ये १७ कामांसाठी ३६५८ कोटी ५१ लाख रुपयांच्या खर्चास मान्यता दिली होती. यात ऐरोली ते काटई मार्गासाठी भूसंपादनाव्यतिरिक्त ९४४ कोटी २० रुपयांचा समावेश होता. हा मार्ग तीन भागांत बांधण्यात येत असून, आता त्याच्या भाग-१ व २ साठी १४४१ कोटी ३९ लाख रुपयांच्या खर्चास डिसेंबर २०२२ मध्ये मंजुरी दिली आहे.ऐरोली-काटई मार्गाचे टप्पे
टप्पा क्रमांक १ मध्ये ठाणे-बेलापूर रस्ता ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ याची लांबी ३.४३ किमी आहे.
टप्पा क्रमांक २ मध्ये ऐरोली खाडीपूल ते ठाणे बेलापूरपर्यंतचा उन्नत रस्त्याची लांबी २.५३ किमी
टप्पा क्रमांक ३ मध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ते काटई जंक्शन ६.३० किमी
नवी मुंबई महापालिकेने तयार केला अहवाल
ऐरोली-काटई मार्गावर चढ-उतारसाठी नवी मुंबईकरांना ‘एमएमआरडीए’ने आपल्या आराखड्यात मार्गिकाच ठेवली नव्हती. यामुळे हा महत्त्वाचा मार्ग नवी मुंबई शहरातून जात असूनही त्याचा शहरवासीयांना काहीही लाभ घेता येणार नव्हता. ना त्यांना मुंबईत जाणे सोपे होणार होते ना कल्याण-डोंबिवलीत. यामुळे स्थानिक लाेकप्रतिनिधींत तीव्र असंतोष होता. अखेर ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांच्या मागणीवरून नवी मुंबई महापालिकेने जोड मार्गिका कोठून करणे शक्य होईल, याबाबत आकार अनुभव कन्सल्टंट यांनी सुसाध्यता अहवाल तयार केला. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने ‘एमएमआरडीए’कडे प्रस्ताव पाठविला होता.
ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जोड मार्गिका
सल्लागरांनी दिलेल्या अहवालानुसार ऐरोली-काटई महामार्गावर चढ-उतारासाठी ठाणे-बेलापूर मार्गावरूनच जाेड मार्गिका केल्यास तिचा केवळ नवी मुंबईकरानाच नव्हे, तर ठाण्याकडून ये-जा करणाऱ्या वाहतुकीस मुंबईसह कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ-भिवंडीकडे ये-जा करण्यासाठी लाभ घेता येईल; तसेच ऐरोली-काटई महामार्ग विरार-अलिबाग मल्टिमोडल काॅरिडोरलाही छेदणार आहे. यामुळे एकंदरीतच वाहतुकीचे मोठे विभाजन होऊन ‘एमएमआरडीए’ क्षेत्रातील सर्वच रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.