नवी मुंबई - कांदळवन संरक्षण व संवर्धनासाठी यापुढे वर्षातून दोन वेळा उपग्रहाद्वारे नकाशे तयार केले जाणार आहेत. कांदळवन परिसरात सीसीटीव्ही बसविणे, वाहनांना बंदी करणे व संरक्षण व्यवस्थेमध्ये वाढ करण्याचा निर्णय कोकण आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी घेतला आहे. कोकण विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. कांदळवन संवर्धन व संरक्षणासाठी सर्व संबंधित शासकीय संस्थांनी एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तक्रारींचे तत्काळ निवारण करण्याच्या सूचना करण्यात आल्यात.
तक्रार निवारणासाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्षासह स्वतंत्र सॅक्रेट्रिएट तयार करणे. कांदळवन परिसरात पोलिस, वनरक्षक, महाराष्ट्र सुरक्षारक्षक मंडळाच्या रक्षकांच्या माध्यमातून गस्त घालण्यात यावी. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत. अतिसंवेदनशील परिसरात वाहनांना बंदी घालण्याची सूचनाही केली. वन परिसराचा प्रत्येक सहा महिन्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून नकाशा तयार करावा. ज्या ठिकाणी वृक्षतोड झाली असेल, त्याचा आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्याच्या सूचनाही दिल्या.