लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : रेल्वेने लांबच्या पल्ल्याच्या गाड्यांमध्ये एसी डब्यात उपलब्ध करून दिलेल्या चादरीदेखील चोरीला जाऊ लागल्याचे प्रकार घडू लागले आहेत. हापा-मडगाव एक्स्प्रेसमध्ये बुधवारी असा प्रकार उघडकीस आला असून, काही दिवसांत २८ चादरी चोरीला गेल्या आहेत. या चादरी प्रवाशांनी पळवल्या की अज्ञात चोरट्याने याचा उलगडा मात्र झालेला नाही. यावरून लांब पल्ल्याच्या रेल्वेत चोरट्यांचा सुळसुळाट सुटल्याचे उघड होत आहे.
लांबच्या पल्ल्याच्या रेल्वेत प्रवाशांचे मोबाइल किंवा इतर महागडा ऐवज चोरीला गेल्याच्या घटना सतत घडत असतात. अशातच रेल्वेतल्या चादरीदेखील चोरीला जाऊ लागल्याचे उघड झाले आहे. लांबच्या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेत एसी डब्यात प्रवाशांसाठी रेल्वेने चादरी उपलब्ध करून दिल्या आहेत. रेल्वेचा प्रवास संपल्यानंतर या चादरी एकत्र करून डब्यात ठेवल्या जातात. परंतु, हापा-मडगाव एक्स्प्रेसमधील अशा २८ चादरी गायब असल्याचे रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यावरून अज्ञाताने या चादरी चोरल्याची शक्यता वर्तवून पनवेल रेल्वे पोलिसांकडे बुधवारी तक्रार केली आहे. त्याद्वारे १९ हजार रुपये किमतीच्या चादरींच्या चोरीप्रकरणी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.