आता प्रतीक्षा १.७६ किमी तुर्भे-खारघर बोगद्याची, खारघर-तळोजा येणार मुंबईच्या टप्प्यात
By नारायण जाधव | Published: February 6, 2024 04:45 PM2024-02-06T16:45:34+5:302024-02-06T16:45:59+5:30
तब्बल तीन हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून हा प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
नवी मुंबई : शहरातील एक वेगाने विकसित होणारे आणि भरभराटीचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खारघर-तळोजाला नवी मुंबईतील वाशी, तुर्भे, जुईनगर, नेरूळ, एपीएमसी मार्केट, टीटीसी औद्याेगिक वसाहत यांना जोडणाऱ्या ५.४९ किमी लांबीचा केटीएलआर अर्थात खारघर-तुर्भे लिंक रोडच्या कंत्राटास संचालक मंडळाने सप्टेंबर २०२३ दिलेल्या मान्यतेनंतर कंत्राटदार ऋत्विक प्रोजेक्टस् व एव्हरास्कॉन (जेव्ही) यांना भागीदारीत नुकतेच कार्यादेश दिले आहेत. यामुळे या प्रकल्पातील महत्त्वाचा टप्पा असलेल्या तुर्भे ते खारघरदरम्यान पारसिक डाेंगराखालील १.७६ किमीच्या बोगद्याच्या बांधकामास कंत्राटदार कंपनी कधी सुरुवात करते, याची प्रतीक्षा नवी मुंबईकरांना लागून राहिली आहे.
चार वर्षांची डेडलाइन
केटीएलआरमुळे केवळ नवी मुंबईतील ही उपगनगरे पंधरा मिनिटांवर येणार नसून मुंबई-ठाण्याहून तळोजा प्रवासाचा वेळही तब्बल अर्ध्या तासाने कमी होणार आहे. तब्बल तीन हजार १६६ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार असून हा प्रकल्प आगामी चार वर्षांत पूर्ण केला जाणार आहे.
मुंबई-ठाणे-खारघर अंतर ३० मिनिटांनी होणार कमी
तुर्भे-खारघरदरम्यानचा हा बोगदा १.७६ किलोमीटरचा राहणार आहे. त्यामुळे तो तळोजाला वाशी, नेरूळ, जुईनगर, खारघर आणि अप्पर खारघरशी जोडणारा थेट दुवा म्हणून काम करेल. नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रातील ठाणे-बेलापूर रोड, पामबीच आणि शीव-पनवेल याप्रमुख मार्गावरील वाहनांची वर्दळ कमी करण्याच्या दृष्टीने सिडको महामंडळाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. यामुळे मुुंबई-ठाणेहून खारघर हे अंतर ३० मिनिटांनी कमी होणार आहे.
कॉर्पोरेट पार्कची कनेक्टिव्हिटी वाढणार
विशेषत: नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर दळणवळण आणि आवश्यक पायाभूत सुविधांवर हजारो कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित केले आहेत. तुर्भे ते खारघर हा जवळपास चौपदरी मार्ग हा याच नियोजनाचा भाग आहे. याअंतर्गत तुर्भे येथून खारघरमधील प्रस्तावित इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्कदरम्यान थेट कनेक्टिव्हिटीसाठी एलिव्हेटेड किंवा ग्रेड-लेव्हल पद्धतीने लिंकरोड तयार करून त्याची जबाबदारी पूर्वी राज्य शासनाने एमएसआरडीसीवर सोपविली होती. त्यानुसार एमएसआरडीसीने विकास आराखडा तयार केला होता. मात्र, कोविडकाळात हा प्रकल्प मागे पडला. नंतर खारघर- तळोजा परिसरात सिडकोने मोठमोठे हौसिंग प्रकल्प हाती घेतले असल्याने तो पूर्ण करण्याची जबाबदारी शासनाने सिडकोवर टाकली.
सायन-पनवेलवरील वाहतूूककोडी होणार कमी
ठाणे-बेलापूर रोडसह शीव-पनवेल या महामार्गावर दिवसाला दोन लाखांपेक्षा जास्त वाहने धावतात. भरघाव वाहनांमुळे या मार्गावर वाहतूककोंडीही होते; परंतु हा मार्ग पूर्ण झाल्यास शीव-पनवेल महामार्गावरील ताण कमी होऊन बोगद्यामुळे खारघर-तळोजा नोड नवी मुंबईतील ऐरोली-घणसोली, कोपरखैरणे, वाशी, तुर्भे, एपीएमसी मार्केट, नेरूळ, जुईनगर एकदम जवळ येणार आहे.