परदेशी वाहनांची संख्या वाढली
By admin | Published: February 4, 2016 02:37 AM2016-02-04T02:37:23+5:302016-02-04T02:37:23+5:30
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे.
जयंत धुळप, अलिबाग
सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतील समस्या आणि सुविधेकरिता स्वत:चे वाहन असावे, या विचारातून गेल्या काही वर्षांत दुचाकी आणि चारचाकी वाहन खरेदीत मोठी वाढ झाली आहे. त्याचबरोबर परदेशी बनावटीच्या ११ चारचाकी गाड्या २०१४ मध्ये नोंदविण्यात आल्या होत्या. त्यामध्ये दुपटीने वाढ होऊन २५ परदेशी बनावटीच्या गाड्या नोंदणीकृत झाल्या आहेत. मोटारसायकली तीन नोंदणीकृत झाल्या होत्या, परंतु २०१५ मध्ये त्यांची संख्या आठ झाली आहे.
परदेशी आलिशान वाहने वापरण्याची मानसिकता वृद्धिंगत होत असल्याचे पेण परिवहन कार्यालयाचे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी सांगितले.
पेण प्रादेशिक परिवहन विभागात २०१४ मध्ये भारतीय बनावटीच्या १५ हजार ८६९ मोटारसायकलींची नोंदणी झाली होती, तर २०१५ मध्ये ती वाढून १८ हजार ६१६ वर पोहोचली आहे. भारतीय बनावटीच्या कार आणि जीप या प्रकारातील चारचाकी वाहनांची नोंदणी २०१४ मध्ये ३ हजार ३७१ होती, ती वाढून आता ३ हजार ५६६ झाली आहे. आठ कोटीपेक्षा अधिक किंमत असणाऱ्या चार गाड्यांची नोंदणी २०१४ मध्ये झाली होती. २०१५ मध्ये या गाड्यांच्या खरेदीत दुपटीने वाढ होऊन तब्बल ११ गाड्या खरेदी झाल्या आहेत. सर्वात महागड्या गाडीची किंमत १ कोटी ६६ लाख ८५ हजार २५८ आहे.
सार्वजनीक वाहतूक वाहनांच्या खरेदीत मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. २०१४ मध्ये रिक्षा, ट्रक व प्रवासी बस या गाड्यांची नोंदणी २ हजार ४०९ झाली होती; मात्र २०१५ मध्ये ही नोंदणी २ हजार २४१ वर आली आहे. ट्रॅक्टर व जेसीबी अशा वाहनांची २०१४ मध्ये नोंदणी १२३ होती. २०१५ मध्ये केवळ ६६ वाहने नोंदणीकृत झाली.