नामदेव मोरे
नवी मुंबई : एप्रिल महिना नवी मुंबईकरांसाठी सर्वाधिक धोकादायक ठरला आहे. एक महिन्यात तब्बल २६,९३० रुग्ण वाढले असून १९४ जणांचा मृत्यू झाला आहे. एक लाख रुग्णसंख्येच्या दिशेने शहराची वाटचाल सुरू झाली आहे. रुग्णवाढीपेक्षा मृत्यूचा वाढणारा आकडा चिंताजनक असून मृत्युदर रोखणे हेच आरोग्य यंत्रणेसमोरील सर्वात मोठे आव्हान आहे.
नवी मुंबईमध्ये मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला. तेव्हापासून या संकटाशी यंत्रणा लढा देत आहे. मार्च ते सप्टेंबर दरम्यान रुग्णसंख्या झपाट्याने वाढत राहिली. जुलैमध्ये सर्वाधिक १४,९६७ रुग्ण वाढले व २०७ जणांचा मृत्यू झाला होता. ऑगस्ट व सप्टेंबरमध्येही १० हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढले. पहिल्या लाटेमध्येही शहरात बेडची कमतरता निर्माण झाली होती. महानगरपालिकेने वाशीमध्ये १२०० बेडचे रुग्णालय सुरू केले. खासगी रुग्णालयांची मदत घेतली. बेडची संख्या वाढविली. ब्रेक द चेन अभियानही प्रभावीपणे राबविल्यामुळे ऑक्टोबरपासून पहिली लाट ओसरण्यास सुरुवात झाली. ऑक्टोबर ते फेब्रुवारी २०२१ पर्यंत पाच महिने सातत्याने रुग्णसंख्या कमी होत होती. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची कमतरता निर्माण झाली.
वेळेत आयसीयू सुविधा मिळत नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढू लागले.
नोव्हेंबरपासून मार्चपर्यंत मृत्युदर नियंत्रणात होता. पाच महिने सरासरी शंभरपेक्षा कमी मृत्यू होत होते. एप्रिलमध्ये मृत्युदरानेही उसळी घेतली व एका महिन्यात १९४ जणांचा मृत्यू झाला. पहिली लाट ओसरल्यानंतर पुन्हा रुग्ण वाढतील याचा अंदाज आरोग्य विभागास आला नाही. पहिल्या लाटेचा अनुभव असतानाही व्हेंटिलेटर्स व आयसीयू बेड वाढविण्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. यामुळे दुसरी लाट धोकादायक ठरली. आरोग्य यंत्रणा कोलमडून गेली. रण एप्रिलमध्ये रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढू लागल्यामुळे शहरवासीयांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर मनपाने पुन्हा गाफील राहू नये. आरोग्य विभागातील उणिवा भरून काढाव्या. शहरात आयसीयू व व्हेंटिलेटर्स बेडची क्षमता वाढवून ऐरोली व नेरूळ रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालवावे, अशी मागणी होऊ लागली आहे.