शाळेविरोधात उपोषण करणाऱ्या पालकांची संख्या वाढली
By admin | Published: February 22, 2017 07:02 AM2017-02-22T07:02:40+5:302017-02-22T07:02:40+5:30
सेंट जोसेफ हायस्कूलच्या विरोधात पालकांनी सहाव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले आहे. शाळेवर जोपर्यंत
पनवेल : सेंट जोसेफ हायस्कूलच्या विरोधात पालकांनी सहाव्या दिवशीही उपोषण सुरू ठेवले आहे. शाळेवर जोपर्यंत कारवाई होत नाही व मागण्या मान्य केल्या जात नाहीत, तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शासनाने लवकरात लवकर उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर पालक रस्त्यावर उतरून शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयाला टाळे लावतील, असा इशारा पालकांनी दिला आहे.
सेंट जोसेफ शाळेच्या मनमानी कारभाराविरोधात सहा पालकांनी गुरुवारपासून बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. सहा दिवस होऊनही शासनाला जाग येत नसल्याचे पाहून पालकांनी व पाठिंबा देणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शाळा बंदची हाक दिली. उपोषण करण्यासाठी पालकांची संख्या वाढत आहे. पालक व अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने केलेल्या ‘शाळा बंद’ या आवाहनाला अल्प प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सोमवार व मंगळवारीदेखील शाळेतील पालकांनी पाल्यांना शाळेत पाठवले होते. या वेळी उपोषणात सामील झालेले पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवू नका, म्हणून समजावत होते. तर अभाविपचे पदाधिकारी शाळेविरोधातील पत्रक वाटून पालकांना या आंदोलनात समाविष्ट होण्याकरिता आवाहन करत होते. (वार्ताहर)
सेंट जोसेफ स्कूलच्या पालकांबरोबर बुधवारी शिक्षण मंत्र्यांची बैठक
नवीन पनवेलमधील सेंट जोसेफ स्कूलबाबत बुधवार २२ फेब्रुवारी रोजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याबरोबर दुपारी ४ वाजता बैठक होणार असल्याची माहिती विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांनी दिली. आज सहाव्या दिवशीही उपोषण सुरू होते. आज त्यांना पाठिंबा देण्यासाठी १0 पालकांनी लाक्षणिक उपोषण केले. सायंकाळी पालक व विद्यार्थ्यांनी रॅली काढली. या आंदोलनाला रोज पालकांचा पाठिंबा वाढत आहे. बुधवारी ५00 महिला पालक आंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मिळते. आंदोलनाचा सोशल मीडियावरून प्रचार केला जात आहे.