महाड : तालुक्यातील पाणीटंचाई दिवसेंदिवस वाढत आहे. जर पाऊस लांबला तर टंचाईगस्त गाव व वाड्यांना पाणीपुरवठा करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. टंचाईग्रस्त गावांकडून आलेले प्रस्ताव मंजूर होण्यास विलंब होत असल्याने सर्वसामान्य जनतेकडून संताप व्यक्त केला जात आहे. सध्या तालुक्यात १३ गावे आणि ७१ वाड्या यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, एक गाव व ३० वाड्यांचे प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या सर्व ठिकाणी पाणीपुरवठा करण्यासाठी आणखी दोन टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी पंचायत समितीमार्फत करण्यात आली आहे.
महाड तालुक्यातील पिंपळकोंड, शेवते, आडी, घुरुपकोंड, साकडी, पुनाडेगाव, सापे तर्फे तुडील, ताम्हाणे अशी १३ गावे आणि ७१ वाड्यांना सहा टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. या गावांना लोकसंख्येच्या आधारावर एक अथवा दोन दिवसांआड टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, काही वाड्यांमध्ये टँकरने आलेले पाणी साठवून ठेवण्यासाठी साठवण टाक्या नसल्याने घरातील हंडे व इतर भांड्यातून पाणी भरून त्यावर ग्रामस्थांना समाधान मानावे लागत आहे.
हंड्यामधून पाण्याचे वाटप करताना पाण्याचा अपव्यय जास्त होऊन वेळही जास्त द्यावा लागत असतो. शासनाने अशा गावांमधून साठवण टाक्यांची व्यवस्था करावी, अशी मागणी टंचाईग्रस्त गावातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. या खेरीज एक गाव आणि ३० वाड्यांनी पाणीपुरवठा करण्याचे प्रस्ताव महाड पंचायत समितीकडे पाठविले असून, हे प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. हे प्रस्ताव तातडीने मंजूर होत नसल्याने या गाव-वाड्यांतील ग्रामस्थांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.