चाचण्यांची संख्या २२ दिवसांत दुप्पट, मृत्युदर झाला कमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 01:49 AM2020-08-06T01:49:04+5:302020-08-06T01:49:13+5:30
मृत्युदर झाला कमी : रुग्णांच्या चाचण्यांसाठीचा होणारा विलंब थांबविण्यातही यश
नामदेव मोरे
नवी मुंबई : आयुक्तांची बदली झाल्यापासून कोरोना नियंत्रणासाठीची कार्यवाही गतिमान झाली आहे. २२ दिवसांत रुग्ण चाचण्यांचे प्रमाण दुपटीपेक्षा जास्त झाली आहे. रुग्ण वाढले, तरी चालतील, पण मृत्युदर शून्यावर आला पाहिजे, असे उद्दिष्ट ठेवून नवीन आयुक्त अभिजीत बांगर यांनी काम सुरू केले आहे. महानगरपालिकेच्या उपाययोजनांना यश येऊ लागले असून, शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६१ वरून ६८ टक्क्यावर पोहोचले असून, मृत्युदर ३.७३ वरून २.६२ टक्के झाला आहे.
नवी मुंबईमधील रुग्णसंख्या पाच हजार झाल्यानंतर, तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांची शासनाने बदली केली होती, परंतु राजकीय वरदहस्तामुळे बदली रद्द करण्यात आली. पुढील २३ दिवसांत रुग्णसंख्या दहा हजारांच्या टप्प्यावर पोहोचल्यानंतर मिसाळ यांची पुन्हा बदली करण्यात आली. नवीन आयुक्त अभिजीत बांगर यांच्यासमोर नवीन टीमला सोबत घेऊन कोरोना नियंत्रणाचे आव्हान निर्माण झाले. पदभार स्वीकारल्यानंतर कोरोना चाचण्यांची संख्या कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी शहरातील रुग्णांचा आकडा वाढला तरी चालेल, पण जास्तीतजास्त चाचण्या करण्यावर लक्ष केंद्रित केले. चाचणीसाठी ५ ते १५ दिवस वाट पाहावी लागत असल्याचे निदर्शनास आल्याने तत्काळ अँटिजेन चाचण्या सुरू केल्या. या चाचण्यांसाठी १८ केंद्र सुरू केली. अर्धा तासात अहवाल मिळू लागल्यामुळे कोरोना रुग्णांवर तत्काळ उपचार करणे शक्य होऊ लागले आहे. वेळेत उपचार सुरू झाल्याने मृत्युदर कमी होऊ लागला आहे.
आयुक्तांनी पदभार घेतला, तेव्हा १३ मार्चपासून १२४ दिवसांत शहरातील कोरोना चाचण्यांची संख्या फक्त २६,७३१ झाली होती. विद्यमान आयुक्तांनी २२ दिवसांत अँटिजेन व आरटीपीसीआर मिळून तब्बल ३२,0८२ चाचण्या केल्या असून, एकूण चाचण्यांची संख्या ५८,८१३ झाली आहे. यापूर्वी रुग्णवाढीच्या भीतीमुळे कमीतकमी चाचण्या केल्या जात होत्या. चाचण्या कमी होत असल्यामुळे व अहवाल वेळेत मिळत नसल्याने, चाचण्यांची संख्या वाढल्याने रुग्णसंख्येत वाढ झाली असली, तरी सामाजिक संसर्ग वाढण्याची तीव्रता कमी झाली आहे. शहरातील मृत्युदर ३.७३ टक्क्यावर पोहोचला होता. त्यामध्ये घट होऊन तो २.६२ टक्क्यांवर आला आहे. यापूर्वी चाचण्यांचा अहवाल मिळण्यासाठी पाच ते १५ दिवसांचा कालावधी लागत होता. महानगरपालिकेने अँटिजेन चाचण्या सुरू केल्यामुळे तत्काळ अहवाल मिळू लागला आहे.
क्वारंटाइनचाचा आकडा अडीच लाखांवर : कोरोना रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. नवी मुंबईमध्ये आतापर्यंत जवळपास २ लाख ४१ हजार नागरिकांना क्वारंटाइन केले आहे. त्यापैकी जवळपास १ लाख ६७ हजार ९१८ जणांनी क्वारंटाइनचा कालावधी पूर्ण केला आहे. उर्वरित ७३ हजार नागरिकांचे होम क्वारंटाइन सुरू आहे.
नवी मुंबईमधील कोरोनाची स्थिती
प्रकार 14 जुलै 4 आॅगस्ट
एकूण चाचणी 26731 58813
रुग्ण 9917 16679
प्रलंबित अहवाल 696 331
होम क्वारंटाइन 52452 73113
क्वारंटाइन पूर्ण 63909 167918
मृत्य 370 437
मृत्यू प्रमाण 3.73 2.62
कोरोनामुक्त 6072 11361
कोरोनामुक्तीचे प्रमाण 61 68