'महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ', पनवेलहून महिला मोटरमनचे सारथ्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2020 06:11 AM2020-01-31T06:11:29+5:302020-01-31T06:11:40+5:30
म्हस्के यांचे पती, आई-वडील आणि बहिणीने या लोकलमधून प्रवास केला.
कळंबोली : पनवेल रेल्वे स्थानक फलाट क्रमांक ४ येथून दुपारी ३.४० मिनिटांनी पनवेल-ठाणे वातानुकूलित लोकल ठाण्याच्या दिशेने धावली. ही लोकल चालविण्याचा पहिला मान महिला मोटरमन मनीषा मस्के, गार्ड स्मिता घोणे यांना मिळाला.
म्हस्के यांचे पती, आई-वडील आणि बहिणीने या लोकलमधून प्रवास केला. बारा डब्यांच्या या लोकलगाडीमध्ये स्वयंचलित दरवाजे आहेत. महिला सुरक्षिततेसाठी खास अॅलर्ट यंत्रणा बसवली आहे. गुरूवारी पनवेल स्थानकावरून ८३ प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास केला. ठाणे ते पनवेल १८५ रुपये तिकीट आहे.
या वेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, पनवेल रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष डॉ. भक्तिकुमार दवे, माजी उपमहापौर चारुशीला घरत, नगरसेवक तेजस कांडपिळे आदी उपस्थित होते.
ही सेवा आरामदायी तसेच सुरक्षिततेच्या दृष्टिने चांगली असल्याचे ज्योती चव्हाण या महिला प्रवाशाने दिली. स्वयंचलित दरवाजे असल्याने ते चालू गाडीमध्ये बंद असतील. त्यामुळे दरवाजाला लटकणे आणि तिथे उभे राहून गर्दी करणे असे प्रकार घडणार नाहीत. तसेच अपघात होणार नाहीत, असे आशीष शर्मा याने सांगितले.
मला रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वातानुकूलित रेल्वे चालवण्याची संधी दिली. महिला सक्षमीकरणाचा वस्तुपाठ ठेवला आहे. मोटरमन म्हणून अनुभव मिळणार आहे.रेल्वे प्रवाशांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळेल.
- मनीषा म्हस्के, मोटरमन, रेल्वे