आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 11:21 PM2020-09-27T23:21:10+5:302020-09-27T23:21:29+5:30

महापालिका आयुक्तांचे निर्देश : विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती स्थापन

Objective verification of payments in private hospitals | आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा

आदेश ! खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करा

Next

नवी मुंबई : कोरोनाबाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून शासन अधिसूचनेचे उल्लंघन करण्यात येऊन, जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून पालिकेस मिळत असल्याने, याची गंभीर दखल घेत आयुक्त अभिजीत बांगर यांनी अशा तक्रारींच्या तत्काळ निवारणासाठी अतिरिक्त आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष लेखापरीक्षण पडताळणी समिती स्थापन केली आहे. खासगी रुग्णालयांतील देयक पडताळणी वस्तुनिष्ठपणे करण्याचे निर्देश बांगर यांनी दिले आहेत.

या पथकांमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, उपआयुक्त राजेश कानडे यांच्या समवेत शनिवारी विशेष आढावा बैठक घेत, बांगर यांनी पथकांना दिलेल्या वेळेत काम पूर्ण करण्याचे निर्देश दिले व देयक तपासणीच्या त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेऊन त्यामध्ये सुधारणा सूचित केल्या. कोरोनाबाधितांवरील वैद्यकीय उपचारांसाठी खासगी रुग्णालयांनी महाराष्ट्र शासनामार्फत जारी करण्यात आलेल्या २१ मे, २०२० अधिसूचनेनुसार देयक रक्कम आकारावी, याबाबत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व ‘हेल्थ केअर प्रोव्हायडर (विविध रुग्णालये, नर्सिंग होम, डिस्पेंसरीज)’ यांना १० आॅगस्ट रोजी आदेश दिलेले आलेले आहेत. तथापि काही रुग्णालयांकडून या आदेशाचे उल्लंघन करण्यात येऊन जास्तीचे दर आकारले जात असल्याच्या तक्रारी रुग्ण, तसेच त्यांच्या नातेवाइकांकडून महानगरपालिकेस प्राप्त होत असल्याने, याची दखल आयुक्तांनी घेतली आहे.

याविषयी प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पालिका क्षेत्रातील कोरोनावर उपचार करणाºया सर्व रुग्णालयांमध्ये जाऊन देयकांची पडताळणी करण्याकरिता ६ विशेष लेखापरीक्षण पथके तयार करण्यात आलेली आहेत. या पथकांमार्फत महानगरपालिका क्षेत्रातील सर्व कोविड रुग्णालयांमधील कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासूनच्या कालावधीतील देयकांची पडताळणी केली जात आहे. कोरोना रुग्णांवर खासगी रुग्णालयांमार्फत शासनाने निश्चित केलेल्या दरांमध्येच योग्य उपचार केले जावेत व त्यामध्ये रुग्णाची कोणत्याही प्रकारे आर्थिक फसवणूक व्हायला नको, हा उद्देश स्पष्ट करीत सर्व रुग्णालयांकडून तशा प्रकारचे बंधपत्र लिहून घ्यावे, असे आयुक्तांनी सूचित केले. या लेखापरीक्षण समितीचा उद्देश देयकांमध्ये आकारण्यात आलेल्या विविध बाबींची दर पडताळणी हा असून, त्यानुसार काम करून दर आठवड्याला पथकनिहाय तपशील आयुक्तांकडे सादर करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. पथकांना आत्तापर्यंत देयके तपासणी करताना आलेल्या अनुभवांची सविस्तर माहिती घेत, आयुक्तांनी त्यामधील सुधारणांविषयी मार्गदर्शन केले व देयके तपासणी करताना वस्तुनिष्ठ काम होईल, याकडे लक्ष देण्याचे निर्देश दिले. खासगी रुग्णालयात उपचार करताना ते शासनाने ठरवून दिलेल्या दरानेच होणे आवश्यक आहे.

तक्रारींसाठी हेल्पलाइन नंबर
खासगी रुग्णालयांमधील कोरोनाविषयक उपचारांच्या देयकांबाबत नागरिकांना तक्रार दाखल करणे सोयीचे व्हावे, याकरिता ‘कोविड १९’ बिल तक्रार निवारण केंद्र कार्यान्वित करण्यात आला असून, त्यासाठी ०२२ २७५६७३८९ हा हेल्पलाइन दूरध्वनी क्रमांक, तसेच ७२०८४९००१० हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक जाहीर करण्यात आलेला आहे.

खासगी रुग्णालयांतील देयकांमध्ये कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये, याकरिता नवी मुंबई महानगरपालिका सतर्क आहे, तरी नागरिकांनी खासगी रुग्णालयातील कोरोना उपचारांच्या देयकांबाबत कोणतीही तक्रार असल्यास, ती महानगरपालिकेने उपलब्ध करून दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर करावी.
- अभिजीत बांगर,
आयुक्त, न.मुं.म.पा.

Web Title: Objective verification of payments in private hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.