वैभव गायकरपनवेल : सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीचा भार कमी करण्याच्या दृष्टीने सिडकोने खारघर ते बेलापूर जोडणारा सागरी मार्ग उभारण्याचे निश्चित केले आहे. याकरिता वर्षभरापूर्वी सिडकोने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून जे. कुमार इन्फ्राला या मार्गाचे काम दिले होते. मात्र, या मार्गावर कांदळवनाचा अडथळा आल्याने वनविभागाची परवानगी मिळाली नसल्याने या मार्गाचे काम रखडले आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पार्श्वभूमीवर सिडकोतर्फे खारघर ते बेलापूरदरम्यान सागरी मार्गाचे काम हाती घेतले. सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक सागरी मार्गाने वळविण्याचा दृष्टीने खारघर ते बेलापूर असा सुमारे ९.५ किमीचा रस्ता दोन टप्यात पूर्ण केला जाणार आहे. याकरिता सुमारे २७३ कोटींचा खर्च सिडको महामंडळ करीत आहे.
खारघर सेक्टर ३४ , सेक्टर १६ स्पॅगेटी वरून कोपरा खाडी, खारघर रेल्वेस्थानक तसेच बेलापूर या मार्गावर हा सागरी मार्ग उभारला जात आहे. हा मार्ग पुढे पाम बीच मार्गावर जोडला जाणार आहे. सिडकोने याकरिता सर्व तयारी केली होती. मात्र, वनविभागाच्या अडथळ्यामुळे हा प्रकल्प ठप्प होण्याची शक्यता आहे. वाशीच्या अंतर्गत येणाऱ्या या प्रकल्पाचे अधिकारी व अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी संबंधित कोस्टल रोडचे काम रखडल्याचे सांगितले.
विमानतळाच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होणार होता. मात्र, वनविभागाच्या अडथळ्यामुळे हा प्रकल्प पूर्णत्वास येण्यास आणखी काही वर्षे लागण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, सर्व टेंडरप्रक्रिया पूर्ण झाल्यावर हा अडथळा निर्माण झाल्याने या प्रकल्पासाठी नव्याने टेंडर प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यामुळे प्रकल्पाचा खर्च वाढणार आहे. या प्रकल्पाचा वाद न्यायालयात गेला होता. वादग्रस्त कंपनीला या सागरी मार्गाचे काम दिल्याने उच्च न्यायालयात यापूर्वी जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.