सत्ताधाऱ्यांचा विकासकामांना अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2017 06:52 AM2017-07-24T06:52:34+5:302017-07-24T06:52:34+5:30

सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. स्थायी समितीसह सर्वसाधारण

Obstruction of the development work of the ruling party | सत्ताधाऱ्यांचा विकासकामांना अडथळा

सत्ताधाऱ्यांचा विकासकामांना अडथळा

Next

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. स्थायी समितीसह सर्वसाधारण सभेमध्ये मुंढे यांच्याविरोधात उघड भूमिका घेतली होती. परंतु कसोटीचा प्रसंग संपताच राष्ट्रवादीने विरोधकांची अडवणूक करण्याचे राजकारण सुरू केले आहे. खासदार यांच्या निधीमधून उभारण्यात येणाऱ्या व्यायामशाळेचा प्रस्तावही स्थगित ठेवला आहे. विकासाच्या कामात राजकारण करण्याच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे.
शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबईमधील विकासकामे मार्गी लावण्याचा धडाका सुरू केला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेला सानपाडा रेल्वे पुलाचा प्रश्न सोडविला असून तेथे नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तुर्भे नाका व सीबीडीमधील रेल्वे क्रॉसिंगवर पादचारी पूल उभारण्याचा प्रश्नही मार्गी लावला आहे. जुईनगर रेल्वे कॉलनीत २० वर्षांमध्ये प्रथमच अत्यावश्यक कामे करण्यास प्रशासनाला भाग पाडले आहे. चिंचपाडा येथे खासदार निधीमधून वीजप्रकल्प उभारण्यात येणार आहे. खासदारांच्या धडाकेबाज कामांमुळे सत्ताधारी राष्ट्रवादीमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या कामांमध्ये अडथळा निर्माण करण्यास सुरवात झाली आहे. खासदार झाल्यानंतर विचारे यांनी रूग्णालयांना भेट दिली असताना व्हेंटिलेटर व इतर अत्यावश्यक उपकरणे नसल्याचे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ४० लाख खासदार निधी महापालिकेकडे वर्ग केला. परंतु प्रशासनाने राजकीय दबावामुळे त्या निधीचा वापर केला नाही व तो परत पाठविला. यानंतर आता सानपाडामध्ये नगरसेवक सोमनाथ वास्कर यांच्या प्रयत्नातून गावदेवी मैदानामध्ये व्यायामशाळा उभारण्यासाठी खासदारांनी तब्बल ५७ लाख ११ हजार रूपये निधी दिला होता. परंतु स्थायी समितीने हा प्रस्ताव स्थगित करून पुन्हा एकदा खासदारांची अडवणूक केली आहे.
राष्ट्रवादीच्या अडवणुकीमुळे शिवसेना नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तुकाराम मुुंढे पालिकेचे आयुक्त असताना त्यांनी लोकप्रतिनिधींना सन्मानजनक वागणूक दिली नव्हती. महापौरांनी त्यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर शिवसेनेने पूर्ण सहकार्य केले होते. सभागृहात राष्ट्रवादीचे नगरसेवक मुंढे यांची कोंडी करण्यात अपयशी ठरत असताना शिवसेनेच्या शिवराम पाटील, संजू वाडे, किशोर पाटकर व इतर नगरसेवकांनी मुंढे विरोधात थेट भूमिका सभागृहात मांडली होती. पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, उपनेते विजय नाहटा यांनीही ठामपणे अविश्वास ठरावाच्या बाजूने भूमिका घेतली होती. परंतु या मदतीचा राष्ट्रवादीला विसर पडला आहे. खासदार निधीचे काम अडवून राष्ट्रवादीने विकासामध्ये अडथळा निर्माण केला आहे. खासदार निधीचे स्वागत करण्याऐवजी विरोध करण्याच्या भूमिकेचा शिवसेनेने निषेध केला आहे.

अविश्वास ठरावाच्या वेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला विनाअट सहकार्य केले होते. त्यावेळी विकासात अडथळे आणणार नाही असे आश्वासन सत्ताधाऱ्यांनी दिले होते. परंतु केलेल्या मदतीचा आता त्यांना विसर पडत असून खासदार निधीच्या कामात अडथळे आणले जात आहे. अशाप्रकारे विकासात अडथळे करण्याची भूमिका सत्ताधाऱ्यांनी सोडावी.
- एम. के. मढवी,
शिवसेना नगरसेवक
सानपाडामधील माझ्या प्रभागामध्ये माजी मंत्री गणेश नाईक यांच्या आमदार निधीमधून २०१४ मध्ये स्मशानभूमीमध्ये ५ लाख रूपयांचे काम केले होते. आम्ही त्या कामाचे स्वागतच केले होते. आता व्यायामशाळेच्या कामामध्ये अडथळा आणू नये. पुढील सभेत प्रस्ताव मंजूर होईल अशी अपेक्षा.
- सोमनाथ वास्कर,
नगरसेवक, शिवसेना


नवी मुंबईमधील जास्तीत जास्त प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहे. सानपाडा पुलाचा प्रश्न मार्गी लागला. तुर्भे व बेलापूर पादचारी पुलाच्या कामासाठी रेल्वेकडे वारंवार पाठपुरावा केला. आरोग्याचा प्रश्न सोडविण्यासाठी ४० लाख रूपये निधी पालिकेकडे वर्ग केला होता, परंतु त्याचा वापर झाला नाही. सानपाडामधील व्यायामशाळेसाठीचा प्रस्तावही स्थगित केला आहे. राष्ट्रवादीने विकासामध्ये असे अडथळे निर्माण करू नये. विकासाचे राजकारण केल्यास नवी मुंबईतील जनता सुज्ञ असून ती धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.
- राजन विचारे, खासदार, ठाणे

संजीव नाईक यांच्या निधीतून बंगला
राष्ट्रवादीचे संजीव नाईक खासदार असताना त्यांच्या निधीतून वंडर्स पार्कमध्ये स्वागत कक्षाच्या नावाने टुमदार बंगला बांधण्यात आला. या बंगल्याचा सामान्य नागरिकांना काहीही फायदा नाही. साऊंड सिस्टीम व बंगल्यासाठी ९६ लाख रूपये खर्च करण्यात आले. पालिकेने वंडर्स पार्क उभारण्यासाठी ३५ कोटी खर्च केले होते. यामध्ये खासदारांचा निधी अत्यंत अल्प होता. यानंतरही वंडर्स पार्कच्या नामफलकावर पालिका व खासदार निधीतून वंडर्स पार्क उभारण्यात आल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. वास्तविक खासदार निधी वंडर्स पार्कमधील बंगल्यासाठीच वापरला असतानाही शिवसेनेने याला विरोध केला नव्हता. खासदारांच्या संयुक्त विद्यमाने उद्यानाची निर्मिती करण्यात आली असल्याविषयी पाटीलाही विरोध केला नव्हता. जनतेने शिवसेनेचा खासदार निवडून दिला आहे. राजन विचारे चांगले काम करत असतील व स्वत:चा निधी नवी मुंबईला देणार असतील तर राष्ट्रवादीने त्याचे स्वागतच केले पाहिजे अशी भूमिका नागरिकांसह शिवसेना नगरसेवक व्यक्त करू लागले आहेत.

Web Title: Obstruction of the development work of the ruling party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.