मॉर्निंग वॉकच्या मार्गात वाहनांचा अडथळा; ज्येष्ठ नागरिकांची कसरत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2020 11:32 PM2020-12-30T23:32:12+5:302020-12-30T23:32:19+5:30
रस्त्याच्या दुतर्फा पार्किंग : ज्येष्ठ नागरिकांची कसरत
नवी मुंबई : बेकायदा पार्किंगचा प्रश्न सध्या जटिल झाला आहे. शहरातील प्रत्येक रस्त्यावर दोन्ही बाजूला वाहनांची पार्किंग दिसून येते. विशेष म्हणजे नागरिकांना फेरफटका मारण्यासाठी नियोजन केलेल्या मॉर्निंग वॉकच्या रस्त्यांवरसुध्दा अलीकडच्या काळात वाहने पार्क केली जात आहेत. दोन्ही बाजूला पार्क होणाऱ्या वाहनांमुळे पदपथ अडविले जातात. त्यामुळे मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांना रस्त्याच्या मधून चालावे लागत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची मोठी गैरसोय होत असून या बेकायदा पार्किंगवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
वाहनांच्या बेशिस्त व मनमानी पार्किंगमुळे शहरातील दळणवळण यंत्रणा चांगलीच प्रभावित झाली आहे. शहराच्या विविध नोडमध्ये जागा मिळेल तेथे वाहने उभी केली जातात. कोपरखैरणेतील महापालिकेचे निसर्ग उद्यान परिसरातील रहिवाशांसाठी पर्वणीचे ठरले आहे.
निसर्ग उद्यानापासून कोपरखैरणे गावच्या शेवटच्या टोकापर्यंतच्या रस्त्यावर सकाळ-संध्याकाळ फिरायला येणाऱ्यांची रीघ लागलेली असते. तसेच या परिसरात असलेल्या उद्यानातसुध्दा अबालवृध्दांची गर्दी असते. कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या उद्यानांत फारशी गर्दी नसली तरी सकाळी मॉर्निंग वॉकला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परंतु मागील काही दिवसांपासून या रस्त्याला पार्किंगचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ट्रक, टँकर, खासगी बसेस, मोडकळीस आलेल्या रुग्णवाहिका, टुरिस्टची वाहने आदी प्रकारच्या वाहनांनी या रस्त्यावर अतिक्रमण केले आहे.
विशेष म्हणजे रस्त्याच्या दोन्ही बाजूला ही वाहने पार्क केली गेल्याने मॉर्निंग वॉकला येणाऱ्या नागरिकांची कसरत होत आहे. नागरिकांना थेट रस्त्यावरून चालावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका आणि वाहतूक विभागाने या वाहनांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
अद्याप कारवाई नसल्याने रहिवाशी नाराज
या रस्त्यालगत मोजकीच नागरी वसाहत आहे. त्यातील रहिवासी आपली वाहने वसाहतीच्या आतच उभी करतात. असे असताना रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जाणारी वाहने कुठली आहेत, असा सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. काही वाहने मागील अनेक दिवसांपासून एकाच जागेवर उभी आहेत. शिवाय नोंदणी क्रमांकावरून यातील बहुतांश वाहने शहराबाहेरील असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या बेकायदा पार्किंगच्या विरोधात स्थानिक रहिवाशांनी गेल्या महिन्यात संबंधित विभागाकडे तक्रार केली होती. परंतु कारवाई झाली नसल्याने रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.