रस्त्यावर उभ्या वाहनांचा होतो अडथळा; नवीन पनवेल येथील चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 12:21 AM2021-04-04T00:21:22+5:302021-04-04T00:21:34+5:30
ना कारवाई ना दंड, वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
कळंबोली : नवीन पनवेल रेल्वे स्थानकासमोर परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी, चारचाकी रस्त्यावर उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. दुहेरी पार्किंग केल्यामुळे रस्ता लहान झाला आहे. त्यामुळे वाहने ये- जा करण्यास तारेवरची कसरत करावी लागत आहे. बेशिस्त वाहतुकीला उधाण आले आहे. जागा मिळेल तिथे वाहने पार्क करण्यात येत आहेत. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष झाल्यामुळे वाहने पार्क करण्यात वाढ झाली आहे. नवीन पनवेल सेक्टर १५, १६ आणि १७ हा परिसर रेल्वे स्थानकामुळे गजबजलेला असतो. मोठ्या प्रमाणात वाहनांची या ठिकाणी वर्दळ असते. रेल्वे स्थानक परिसरातील पदपथ व्यवसाय धारकांनी गिळंकृत केला आहे.
पदपथावर व्यवसाय थाटल्याने नागरिकांना चालण्यास पदपथ राहिले नाही. त्याचबरोबर रस्त्यावर दुहेरी बाजूस वाहने पार्किंग केल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या परिसरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या परिसरातील सोसायटी धारक वाहतूक पोलिसांकडे वारंवार तक्रारी दाखल करतात. मात्र, पोलिसांकडून कारवाई मात्र शून्य होत असल्याने पार्किंगचे पेव वाढत चालले आहे. सकाळ आणि संध्याकाळी परिसरात चालणे मुश्कील होत आहे. सम- विषम पार्किंग फलक नावालाच उरले आहेत. रस्त्यावर वाहने आडवी तिडवी पार्क केल्याने वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या पार्किंगमुळे होणारा त्रास दूर करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
पार्किंगसाठी तोकडी व्यवस्था
या परिसरात पे ॲन्ड पार्किंगसाठी सिडकोकडून एकच प्लॉट देण्यात आला आहे. रेल्वे प्रशासन तसेच सिडकोकडून पार्किंग व्यवस्थेसाठी जागा उपलब्ध करणे अपेक्षित आहे; परंतु तोकडी व्यवस्था असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. रिक्षा स्टॅन्ड नसल्यामुळे रिक्षादेखील दुहेरी रस्त्यावर पार्क केल्या जात आहेत. नवीन पनवेल परिसरातील वीस फुटांचा असलेला रस्ता दिवसभर वाहने पार्किंग केल्यामुळे दहा फुटांचा होत आहे.