- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई - फानी वादळामुळे बाधित झालेल्या ओडिशाला नवी मुंबईतून मदतीचा हात मिळणार आहे. नवी मुंबईत स्थायिक झालेल्या मूळच्या ओडिशावासीयांनी त्याकरिता पुढाकार घेतला असून, यासंदर्भात रविवारी बैठक घेण्यात आली. वाशीतील ओडिशा भवनमध्ये झालेल्या या बैठकीत सर्वाधिक नुकसान झालेले गाव दत्तक घेऊन तिथल्या रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला.फानी वादळामुळे ओडिशाच्या अनेक गावांचे पूर्णपणे नुकसान झाले आहे. सद्यस्थितीला तिथले जनजीवन विस्कळीत झाले असून अन्नपाण्याचीही गैरसोय झालेली आहे, तर संपूर्ण भागाचा वीजपुरवठा, फोन लाइन खंडित असल्यानेही अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. त्यात सुधार होण्यासाठी अद्याप तीन ते चार दिवस लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर ओडिशामध्ये प्रत्यक्षात झालेल्या नुकसानीची माहिती कळू शकणार आहे. तत्पूर्वी फानी पीडितांपर्यंत पिण्याचे स्वच्छ पाणी व औषधे पुरवण्यासाठी नवी मुंबईत स्थायिक असलेल्या ओडिशावासीयांनी पुढाकार घेतला आहे. वाशीतील ओडिशा भवनमध्ये रविवारी प्रमुख व्यक्तींची बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तसेच इच्छुक व्यक्तींनी देखील मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. फानीमुळे ओडिशामधील अनेक भागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.मात्र ही गावे पूर्णपणे संपर्काबाहेर असल्याने तिथली सत्यपरिस्थिती समोर येऊ शकली नसल्याची चिंता रश्मीकांत महापात्रा यांनी व्यक्त केली आहे. ही माहिती समोर आल्यास ज्या गावाचे सर्वाधिक नुकसान झाले असेल, ते गाव दत्तक घेऊन तिथले विस्कळीत झालेले जनजीवन सुरळीत करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ओडिशावासींना नवी मुंबईतून मदत, सर्वाधिक नुकसान असलेले गाव घेणार दत्तक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 2:11 AM