नवी मुंबई : कासाडी नदीमध्ये रसायनमिश्रित पाणी सोडत असलेला टँकर खंडणी विरोधी पथकाने पकडला आहे. याविषयी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने टँकर चालकावर गुन्हा दाखल केला आहे.तळोजा औद्योगिक वसाहतीमधील कारखानदार रसायनमिश्रित पाणी कासाडी नदीमध्ये सोडत आहेत. अनेक जण थेट नदीमध्ये पाणी सोडत आहेत. एमआयडीसीच्या बाहेरूनही टँकरमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यांमध्ये सोडत असून, तेथून ते नदीमध्ये जात आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होऊ लागले आहे. नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रोडपालीमधील स्थानिक नागरिक योगेश पकडे व त्यांचे सहकारी कासाडी नदीमधील प्रदूषण रोखण्यासाठी लढा देत आहेत. याविषयी अनेक तक्रारी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे व शासनाकडे केल्या आहेत; परंतु त्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. १५ जूनमध्ये तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये केमिकल सदृश पाणी नाल्यात सोडले जात असल्याचे खंडणी विरोधी पथकाच्या निदर्शनास आले. त्यांनी याविषयी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी ए. डी. मोहेकर यांना माहिती दिली. मोहेकर यांनी तत्काळ याविषयी उपप्रादेशिक अधिकारी जयवंत शंकर हजारे यांना माहिती दिली. हजारे यांनी घटनास्थळी जाऊन एमएच ४६ एआर ७८१८ या टँकरमधील पाण्याचे नमुने ताब्यात घेतले. पोलिसांसमोर पंचनामा करण्यात आला. रसायनमिश्रित पाण्याचे नमुने तळोजामधील मुंबई वेस्ट मेंटनन्स कंपनीमध्ये पाठविण्यात आले होते. १७ जूनला रसायनमिश्रित पाण्याच्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले. त्या पाण्याचा पीएच ३.६ व सीओडी ३९६०० एवढा असल्याचे निदर्शनास आले. हा अहवाल प्रादेशिक अधिकारी हजारे यांनी तळोजा पोलीस स्टेशनकडे पाठवून तक्रार केली होती.प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाºयांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी टँकरचालकावर गुन्हा नोंदविला आहे. रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडून तेथील वातावरणास अपाय केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. गुन्हा दाखल केल्यामुळे नदीमध्ये दूषित पाणी सोडणाºयांचे धाबे दणाणले आहे. वास्तविक नियमितपणे टँकरमधून व थेट नदीपात्रामध्ये दूषित पाणी सोडले जात असून, संबंधितांवर कारवाई करण्याचे प्रमाण वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.कारखानदारांवर कारवाई व्हावीनाल्यात दूषित पाणी सोडणाºया टँकरचालकावर गुन्हा दाखल झाला आहे; परंतु प्रत्यक्षात ज्या कारखान्यातून हे दूषित पाणी आणण्यात आले त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक आहे.याशिवाय अनेक कारखानदार थेट नदीमध्ये दूषित पाणी सोडत असून, त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाल्याशिवाय प्रदूषण थांबणार नसल्याचे मतही नागरिक व्यक्त करू लागले आहेत.
नदीत रासायनिक पाणी सोडणा-यावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:07 AM