नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या तुर्भे येथील विभाग कार्यालयाची दुरवस्था झाल्याने या ठिकाणी काम करणारे पालिका अधिकारी, कर्मचारी, तसेच कामानिमित्त विभाग कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विभाग कार्यालयात होणारी गैरसोय टाळण्याच्या अनुषंगाने विभाग कार्यालयाच्या इमारतीची सुधारणा करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मांडला होता. या कामाला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.महापालिकेच्या तुर्भे विभाग कार्यालयाच्या इमारतीमधून तुर्भे प्रशासकीय विभागाचे कामकाज चालते. या इमारतीचे बाहेरील प्लास्टर, रंग, कंपाउंड, शौचालय खराब झाले असून, इमारतीच्या छताला गळती लागली आहे. इमारतीची संरक्षक भिंत आणि ग्रील देखील तुटले आहेत. जोत्यालगतचा भाग उंदीर आणि घुशींनी पोखरून भुसभुशीत केला आहे, त्याचप्रमाणे विभाग कार्यालयात येणाºया दिव्यांग नागरिकांना चालण्यासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्याअनुषंगाने विभाग कार्यालयाची दुरु स्ती आणि सुधारणा करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समिती बैठकीत मंजुरी मिळाली आहे. या कामाच्या अनुषंगाने तुर्भे विभाग कार्यालयात मॉड्युलर फर्निचर पुरविणे, वॉटर प्रुफिंग करणे, सोलिंग करणे, पीसीसी करणे, ग्रील बसविणे, दगडी विटांचे बांधकाम करणे, प्लास्टर करणे, पाणीपुरवठा व सॅनिटरीची सुविधा पुरविणे, दिव्यांग व्यक्तींकरिता लिफ्ट बसविणे आदी कामे करण्यात येणार आहेत. या कामासाठी एक कोटी वीस लाख रुपये खर्च केले जाणार आहेत.
तुर्भे विभाग कार्यालय कात टाकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 4:39 AM