अधिकारी निवडणुकीच्या कामात तर फेरीवाले जोमात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 11:25 PM2019-10-12T23:25:39+5:302019-10-12T23:25:52+5:30
कारवाई करण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
योगेश पिंगळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे शहरातील फेरीवाल्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. रेल्वे स्टेशन व महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथावर फेरीवाल्यांनी ठाण मांडले असून, त्यामुळे रहदारीसही अडथळे निर्माण झाले आहेत.
नवी मुंबई शहरातील नेरु ळ, सानपाडा, वाशी आदी ठिकाणच्या वर्दळ असलेल्या ठिकाणचे पदपथ फेरीवाल्यांनी काबीज केले आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथावरून चालणे जिकिरीचे झाले आहे. रेल्वे स्थानकांजवळील पदपथावर खाद्यपदार्थ, फळे, भाजी, कापडविक्रे त्यांनी जागा अडविण्यास सुरुवात केली आहे. फेरीवाल्यांनी पदपथावर थाटलेल्या व्यवसायामुळे रेल्वे स्थानकांबाहेरील परिसरात वाहतूककोंडीची समस्या उद्भवत आहे. नेरु ळ रेल्वेस्थानकाच्या बाहेरील पदपथावर फेरीवाले बेकायदेशीरपणे व्यवसाय करतात. तसेच याच पदपथासमोर रस्त्याच्या कडेला हातगाड्यांवरही फेरीवाले व्यवसाय करीत आहेत. यामुळे रस्त्याचा बराचसा भाग व्यापला जात असून, वाहने ये-जा करताना अडथळा निर्माण होऊन संध्याकाळी वाहतूककोंडी होत आहे. महापालिकेच्या माध्यमातून कारवाई केल्या जातात; परंतु गेल्या काही दिवसांपासून कारवाईकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले असून, यामुळे नागरिकांना व वाहनचालकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
कोपरखैरणे सेक्टर १५ व १८ च्या मधील रोडवर दोन्ही बाजूला फेरीवाले बसत आहेत. सायंकाळी हा रोड वाहतुकीला जवळपास बंद केला जात आहे. रोडवरून पायी जाणेही अशक्य होऊ लागले आहे.
नागरिकांमध्ये नाराजी
नेरुळ, सानपाडा रेल्वेस्टेशन व शहरातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी रोडसह पदपथ फेरीवाल्यांनी अडविले आहेत. पदपथावरून चालणेही अशक्य होऊ लागले आहे. वाहतूककोंडीही होत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. कारवाई होत नसल्यामुळे पालिकेविषयी असंतोष निर्माण होऊ लागला आहे.
फेरीवाल्यांना अभय
महापालिका प्रशासन कधीच गांभीर्याने अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करत नाही. आयुक्तपदावर तुकाराम मुंडे असताना शहरातील फेरीवाले गायब झाले होते. रोड व पदपथ मोकळे झाले होते; परंतु त्यांच्या बदलीनंतर पुन्हा जैसे थे स्थिती झाली आहे. विभाग कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांकडून अभय मिळू लागले आहे.
शहराबाहेरून येत आहेत विक्रेते
नवी मुंबईच्या बाहेरून मानखुर्द, गोवंडी व इतर ठिकाणावरून फेरीवाले नवी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. मोक्याच्या ठिकाणी जागा अडविल्या जात आहेत. निवडणुकीमध्ये अधिकारी व कर्मचारी व्यस्त असल्याने कारवाई होत नाही. याचा गैरफायदा घेऊन शहरात कायमस्वरूपी बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला जात आहे.