पनवेलमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांचे बेशिस्त वर्तन
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 02:14 AM2019-06-26T02:14:15+5:302019-06-26T02:14:27+5:30
अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत.
नवी मुंबई - अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजामुळे पनवेल महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. कर्मचा-यांचे पार्टी प्रकरण ताजे असताना अजून एक अधिकाºयाच्या प्रतापाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे.
स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहणाºया पनवेल महापालिकेमधील कामकाजाला शिस्त लावण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. आयुक्त गणेश देशमुख यांनी पदभार स्वीकारल्यापासून लोकप्रतिनिधी व प्रशासन यांच्यामध्ये योग्य समन्वय साधला आहे. विकासकामांनाही गती देण्यास सुरवात केली आहे. परंतु काही अधिकारी व कर्मचाºयांच्या चुकीच्या वर्तनामुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होऊ लागली आहे. महापालिकेमध्ये कार्यरत असलेल्या एका अधिकाºयाची छायाचित्रे समाज माध्यमांमधून व्हायरल होऊ लागली आहेत. सुट्टीच्या दिवशी महापालिकेची गाडी घेऊन हे अधिकारी अवैध काम करण्यासाठी गेले होते. ते जिथे गेले होते तेथील नोंदवहीमधील त्यांच्या नावाचा उल्लेख असून त्याचीही छायाचित्रे काढून ती समाज माध्यमांवर टाकली जात आहेत. हा प्रकार खरा आहे की खोटा, सुट्टी दिवशी महापालिकेच्या वाहनाचा चुकीचा वापर केला आहे का? करण्यात आलेल्या आरोपांमध्ये तथ्य आहे का याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. पालिकेमधील कंत्राटी कर्मचाºयांचे शोषण होत आहे का याचीही चौकशी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पनवेल महापालिकेमधील पाणीपुरवठा कर्मचाºयाच्या सेवानिवृत्तीनिमित्त काही दिवसापूर्वी अधिकारी व कर्मचाºयांनी पार्टी केली होती. महापालिकेच्या हौदाजवळ मद्यपान करून धिंगाणा घातल्याचा प्रकार उघडकीस आला होता. याविषयी प्रशासनावर चौफेर टीका करण्यात झाली होती. आयुक्तांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून पाच कर्मचारी व एका अधिकाºयाला निलंबित केले होते. यामुळे आता छायाचित्रे व्हायरल झालेल्या अधिकाºयाविषयी आयुक्त काय भूमिका घेणार याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे. याविषयी प्रतिक्रिया घेण्यासाठी आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता घडलेला प्रकार सुट्टीच्या दिवशीचा असून याविषयी सविस्तर माहिती घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.