कोकणातील अधिकाऱ्यांना मुख्यालय न सोडण्याचे आदेश
By कमलाकर कांबळे | Published: July 19, 2023 04:55 PM2023-07-19T16:55:35+5:302023-07-19T16:56:26+5:30
वाढत्या पावसामुळे नद्यांना येणारे पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात.
नवी मुंबई : हवामान विभागाने कोकण विभागात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीस कोकण विभागातील सर्व जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना जिल्हा आणि तालुका पातळीवर सर्व यंत्रणा सज्ज ठेवून या काळात मुख्यालय न सोडण्याच्या सूचना दिल्या.
वाढत्या पावसामुळे नद्यांना येणारे पूर, भूस्खलन, दरडी कोसळणे, सखल भागात पाणी साचणे, या नैसर्गिक आपत्तींपासून नागरिकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने उपाययोजना कराव्यात. पूर प्रवण क्षेत्रातून नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे. त्यासाठी लागणारी साधन सामग्री तसेच मनुष्यबळ उपलब्ध असल्याची खात्री करावी, अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या आहेत. त्याचप्रमाणे प्रत्येक विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली असून, या काळात मुख्यालय न सोडण्याच्या सूचना दिल्या आहेत.
धरणांची सुरक्षितता तपासा
संभाव्य नैसर्गिक आपत्ती लक्षात घेता सर्व यंत्रणांनी आपल्या विभागाने आपत्ती निवारणासाठी सज्ज राहावे. तसेच प्रत्येक विभागाने २४X७ नियंत्रण कक्षाची स्थापना करून त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी समन्वय अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी. पूरप्रवण भागात शोध व बचाव सुस्थितीतील साहित्य पोहोच करावे, जलसंपदा विभागाने धरणांची सुरक्षितता तपासून घ्यावी, धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यापूर्वी नागरिकांना सूचना द्याव्यात, अशा सूचना, विभागीय आयुक्त डॉ. कल्याणकर यांनी बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.