नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी थांबता थांबेना, कामगार संघटनेत नाराजी

By नारायण जाधव | Published: December 29, 2023 04:14 PM2023-12-29T16:14:41+5:302023-12-29T16:15:03+5:30

अवर सचिव किसन पलांडे नवे उपायुक्त

Officers on deputation in Navi Mumbai Municipal Corporation workers not happy | नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी थांबता थांबेना, कामगार संघटनेत नाराजी

नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवरील अधिकारी थांबता थांबेना, कामगार संघटनेत नाराजी

नवी मुंबई : कर्मचाऱ्यांचा विरोध असतानाही नवी मुंबई महापालिकेत प्रतिनियुक्तीवर येणाऱ्या अधिकाऱ्यांचे लोंढे थांबता थांबत नसल्याचे दिसत आहे. आधीच क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात प्रतिनियुक्तीवर आलेले अधिकारी झालेले असताना, आता पुन्हा राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने शालेय शिक्षण विभागातील अवर सचिव किसनराव बबनराव पलांडे, यांची नवी मुंबई महापालिकेत उपायुक्तपदी तीन वर्षांकरिता नियुक्ती केली आहे. गुरुवारी त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले आहेत.

महापालिकेत प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांसह सहायक आयुक्तांचा भरणा अधिक आहे. यामुळे मूळ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. महापालिकेतील विद्यमान अनेक अधिकाऱ्यांना मागील लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी बढत्या न देऊन तसा प्रस्ताव नगरविकासकडे न पाठविल्याने त्यांना आता बढत्या देण्यात अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे अनेक अधिकारी पात्र असूनही त्यांना खालच्या पदावर काम करावे लागत आहे. काही अधिकारी तर बढतीच्या प्रतीक्षेत निवृत्तही झाले आहेत.

महापालिकेतील कामगार संघटनांनी प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांच्या नियुक्तीस विरोध केला आहे. शासनाचे असेच धोरण असेल तर त्यांनी शिपायापासून आयुक्तांपर्यंत सारेच अधिकारी प्रतिनियुक्तीवर भरावेत, असा उपरोधिक सूर आता विद्यमान कर्मचाऱ्यांत उमटू लागला आहे.

Web Title: Officers on deputation in Navi Mumbai Municipal Corporation workers not happy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.