नवी मुंबई : मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी नुकतेच महानगरपालिका कर्मचाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून उठाबशा काढून कानफटात मारण्याची धमकी दिली होती. या घटनेचे तीव्र पडसाद महानगरपालिकेमध्ये उमठले आहेत. आज सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून या झुंडशाहीचा निषेध केला.अशा प्रकारे कोणत्याही अधिकारी, कर्मचाऱ्यांना धमकावले जावू नये अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयासह सर्व कार्यालयांमधील अधिकारी व कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम केले. नवी मुंबई महानगरपालिकेने स्वच्छता अभियानामध्ये देशपातळीवर सातत्याने नावलौकीक मिळविला आहे. इतर शहरांच्या तुलनेमध्ये शहरात दर्जेदार सुविधा पुरविल्या जात आहेत. या कामगिरीची शासनाने वेळोवेळी दखल घेतली आहे. या यशामध्ये मनपाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचाही मोठा वाटा आहे. परंतु काही राजकीय व इतर घटक वारंवार अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे व धमकावण्याच्या घटना घडत आहेत. मनसेचे शहर प्रमुख गजानन काळे यांनी अधिकाऱ्याच्या कानफाटात मारेल, उठाबशा काढा, तोंडावर कचरा फेकेल असे उद्गार काढले होते. हा प्रकार कर्मचाऱ्यांचे मनोबल खच्ची करणारे आहे. यामुळे या घटनेचा निषेध करण्यासाठी सर्वांनी काळ्या फिती लावून काम केल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आमचा लढा कोणा एका व्यक्ती किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांविषयी नसून झुूंडशाही करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात आहे. काही शंका असतील कामामध्ये त्रुटी असतील तर सनदशीर मार्गाने सांगाव्या व त्यामधून मार्ग काढावा अशी अपेक्षाही कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. श्रमीक सेनेचे अध्यक्ष राजूसिंग चव्हाण, सरचिटणीस राम चव्हाण, सनील गावीत, उमा अगरवाड, सुनील राठोड, अभिजित वसावे, रूपाली कुमावत, राकेश आंबेकर, बळीराम जाधव, डी के म्हात्रे, हरिश्चंद्र भोसले, रोहिदास पवार, ज्योती लहारे, महेश मोरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचाऱ्यांनीही आंदोलनात सहभाग घेतला होता. सर्व कार्यालयांमधील कर्मचारी उत्स्फुर्तपणे सहभागी झाले होते अशी प्रतिक्रिया राजुसिंह चव्हाण यांनी दिली.