नवी मुंबई: दुकानाच्या समोरील अतिक्रमणावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाच्या विरोधात वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर मोरे यांनी अलिकडेचे महापालिकेच्या वाशी विभाग अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे. महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार त्यांनी विभागातील अतिक्रमणांच्या विरोधात मोहिम सुरू केली आहे. त्याअंतर्गत शनिवारी वाशी सेक्टर १५ येथील बी ३ टाईप इमारतीच्या तळमजल्यावरील निवासी जागेत बॅक विकण्याचा व्यवसाय सुरू होता. प्राप्त तक्रारीच्या अधारे त्यांनी आपल्या पथकासह सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कारवाईसाठी दाखल झाले.
मार्जिनल स्पेसवर विक्रीसाठी ठेवलेल्या बॅग्ज जप्त करून गाडीतून ते घेवून जात असताना दुकान मालक मनमोहन सिंग मैनी हा त्यांच्या अंगावर धावून गेला. इतर साथिदारांच्या सहाय्याने त्याने गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच गाडीवर चढून हाताने बुक्के मारीत वाहन चालकाला शिवीगाळ केल्याची तक्रार मोरे यानी वाशी पोलिस ठाण्यात केली आहे.
या तक्रारीच्या आधारे मनमोहन सिंग आणि त्याच्या अन्य साथिदारांवर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कलम ३०४, ३५३, ५०४, ३४१ आणि कलम ३४ अन्वये वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरिक्षक समीर बागडे याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.