उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 06:42 PM2023-09-08T18:42:17+5:302023-09-08T18:44:02+5:30

लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.

Oil spill from ONGC project in Uran blackened the coast | उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

उरणच्या ओएनजीसी प्रकल्पाच्या तेल गळतीमुळे किनारा काळवंडला  

googlenewsNext

मधुकर ठाकूर -

उरण : येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइल साठवणीच्या नादुरुस्त व्हाल्वमुळे शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर गळती लागली.यामुळे लाखो लिटर्स क्रूड ऑइल मागणीदेवीच्या नाल्यातून थेट समुद्रात पोहचल्याने मोठ्या प्रमाणावर जलप्रदूषण झाले आहे.पीरवाडी समुद्र किनाऱ्यावरील परिसरात तेलाचे जाड थर निर्माण झाल्याने समुद्र काळवंडला आहे.परिसरातील मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान ओएनजीसी प्रशासनाने किनाऱ्यावरील जमा झालेले ऑईलचे थर मशिन, कामगारांच्या साहाय्याने ड्रममध्ये भरुन गोळा करण्याचे काम पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू केले आहे.


येथील ओएनजीसी प्रकल्पातील क्रूड ऑइलच्या साठवण टाकीला शुक्रवारी (८) पहाटे गळती लागली. मोठ्या प्रमाणावर लागलेल्या गळतीमुळे क्रूड ऑइलचे थर संरक्षक भिंती जवळ असलेल्या मागणीदेवीच्या नाल्यातुन थेट पीरवाडी परिसरातील किनाऱ्यावर पोहचले.ओएनजीसी व्यवस्थापनाला गळतीची माहिती मिळाल्यानंतर पहाटेपासूनच किनाऱ्यावर जमा झालेले ऑईलचे जाड थर कामगार लाऊन ड्रम, बादली, सक्शन पंपने गोळा केले जात आहेत.मात्र नाल्यातुन वाहत गेलेले क्रूड ऑइल थेट समुद्रात पोहचल्याने पाण्यावर तेलतवंग दिसु लागले आहेत.

यामुळे मोठ्या प्रमाणावर सागरी प्रदुषण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जलप्रदुषणामुळे परिसरातील स्थानिक मासेमारीही धोक्यात आली असल्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली जात आहे.परिसरातील शेतीलाही धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.
 ओएनजीसीत वारंवार घडणाऱ्या तेल गळतीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत.त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.त्याशिवाय वारंवार तेल गळतीच्या प्रकारामुळे परिसरातील हजारो नागरिकांची सुरक्षाही धोक्यात आली आहे.याआधीच तेल गळतीमुळे लागलेल्या भीषण आगीत अधिकारी, अग्निशमन दलाच्या जवानांसह पाच जण मृत्यू पावले आहेत.उरण ओएनजीसी प्रकल्पात जुने जाणकार आणि अनुभवी कामगार सेवानिवृत्त झाले आहेत. नव्याने भरती झालेले अधिकारी आणि कामगार यांना प्रकल्पाची फारसी माहिती नसल्यामुळेच प्रकल्पात वारंवार तेल गळतीचे प्रकार घडत असल्याचा गंभीर आरोप स्थानिक कामगारांकडून केला जात आहे.या
प्रकरणी अधिक माहितीसाठी ओएनजीसी प्रशासनाच्या संपर्कात असल्याची माहिती उरण तहसीलदार डॉ.उध्दव कदम यांनी दिली.

प्रकल्पातील साठवण टाकीच्या व्हाल्वच्या लिकेजमुळे क्रूड ऑइल नाल्यातुन थेट समुद्र किनाऱ्यावर पोहोचले आहे.गळतीमुळे किनाऱ्यावर जमा झालेले तेल जमा करण्याचे पहाटेपासूनच युध्दपातळीवर सुरू करण्यात आले आहे.समुद्रात पोहचण्याआधीच तेल जमा करण्यात येत असल्याने परिसरातील मासेमारी,शेती  आणि नागरिकांना कोणत्याही प्रकारचा धोका नसल्याचे मुख्य प्रकल्प अधिकारी सुभोजीत बोस यांनी सांगितले.
 

 

Web Title: Oil spill from ONGC project in Uran blackened the coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.