राष्ट्रवादीबरोबरचे जुने हिशेब चुकते
By admin | Published: May 12, 2016 02:23 AM2016-05-12T02:23:32+5:302016-05-12T02:23:32+5:30
स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी व नाईक परिवाराबरोबरचे जुने हिशेबही चुकते केले.
नवी मुंबई : स्थायी समिती सभापती निवडणुकीच्या निमित्ताने शिवसेना व भाजपा नेत्यांनी राष्ट्रवादी व नाईक परिवाराबरोबरचे जुने हिशेबही चुकते केले. यापूर्वी नाईकांच्या आदेशानंतर कोणत्याही प्रसंगाला भिडणारे एकेकाळचे सहकारी यावेळी त्यांचा पराभव करण्यासाठी जीवाचे रान करत होते.
नवी मुंबईच्या राजकारणावर गणेश नाईक यांचे जवळपास तीन दशके वर्चस्व राहिले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासून त्यांचे या संस्थेवर एकहाती वर्चस्व राहिले आहे. विकासाची दिशा, निर्णय व त्यांची अंमलबजावणीमध्ये त्यांचा शब्द अंतिम असायचा. विकासकामे करून घेण्यासाठी विरोधी पक्षातील नगरसेवकही व्हाईट हाऊस, कॉरी व रेतीबंदर कार्यालयामध्ये हजेरी लावत असल्याचे अनेक वेळा पहावयास मिळाले होते. नाईकांनी जनसंपर्काच्या बळावर स्वत:चे वलय निर्माण केले आहे. राजकीय वाटचालीमध्ये अनेक वेळा पराभवास सामोरे जावे लागले असले तरी सत्तेचे केंद्र तेच राहिले होते. महापौर, स्थायी समितीसह अनेक निवडणुकीमध्ये नाईकांनी संख्याबळ कमी असतानाही विजय मिळविला होता. परंतु स्थायी समिती सभापती निवडणुकीमध्ये संख्याबळ असतानाही पराभवास सामोरे जावे लागले. त्यांच्या पराभवाची शहरात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कारण या निवडणुकीनिमित्त शिवसेना, भाजपा व काँगे्रसमधील अनेकांनी जुने हिशेब चुकते करण्याचे समाधान मिळविले आहे.
राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करण्यासाठी विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांनीही जीवाचे रान केले होते. यापूर्वी अनेक वर्षे चौगुले हे नाईक यांचे निष्ठावंत म्हणूनच ओळखले जात होते. त्यांच्या इशाऱ्यावर अनेक निवडणुकांचे निकाल त्यांनी बदलविले होते. परंतु गणेश नाईक यांच्या पुढील पिढीचे विचार न पटल्याने त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. चौगुले यांच्याप्रमाणे किंबहुना त्यांच्यापेक्षा जास्त धावपळ केली ती एम. के. मढवी यांनी. मढवीसुद्धा यापूर्वी नाईक यांचे निष्ठावान म्हणूनच ओळखले जातात.अद्याप ते गणेश नाईकच आमचे गॉडफादर असल्याचे जाहीर सांगतात. परंतु आमदार संदीप नाईक यांच्याशी भांडण झाल्याने ते बाहेर पडले. याशिवाय भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रेही अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्येच होत्या. नाईक पक्षामध्ये योग्य सन्मान देत नसल्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामध्ये प्रवेश केला. याशिवाय माजी आयुक्त विजय नाहटा हेही नाईक यांच्या कार्यपद्धतीला वैतागले होते. एकेकाळी नाईक यांच्यासोबत काम केलेल्या या पदाधिकाऱ्यांनीच यावेळी त्यांना पराभूत करण्यासाठी जीवाचे रान केले होते.
नाईकांची कार्यपद्धती व त्यांच्या खेळी जवळून पाहिल्या असल्याने व राजकीय डावपेचांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्यक्षात धावपळ करण्याचा अनुभव असल्यानेच
स्थायी समितीमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव करणे शक्य झाले आहे. ताईगिरीची ताकद
भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे या राष्ट्रवादीच्या पहिल्या महिला प्रदेशाध्यक्षा. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेवून शरद पवार यांनी त्यांची विधान परिषदेवर नियुक्ती केली होती. परंतु नाईक यांनी त्यांना कधीच विश्वासात घेतले नाही. निर्णय प्रक्रियेमध्येही कधीच घेतले नाही. यामुळे त्यांनी पक्ष सोडला तेव्हापासून नाईकांना कोंडीत पकडण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असून स्थायी समिती निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. स्थायी समिती सभापती निवडणुकीमधील पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागला. उपमहापौरपद व स्थायी समिती सदस्य व एक विशेष समितीचे सभापतीपद दिल्यानंतरही काँगे्रसने धोका दिला. शिवसेना व भाजपा नेत्यांनी कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडली नाही. सध्या पालिकेमध्ये सत्ता राष्ट्रवादीची परंतु महापौर अपक्ष, उपमहापौर काँगे्रस व स्थायी समिती सभापतीपद शिवसेनेकडे अशी स्थिती आहे. सत्ता असूनही राष्ट्रवादीच्या हातातून महत्त्वाची पदे गेली आहेत. अशा स्थितीमध्ये राष्ट्रवादी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.