नवी मुंबई : वाशी सेक्टर ४ येथील राज्य विमा कामगार महामंडळाची जुनी इमारत ढासळली. गेल्या २० हून अधिक वर्षांपासून तिथल्या इमारती वापराविना पडून आहेत. सेक्टर ५ येथे कामगार रुग्णालय सुरू केल्यानंतर दोन ठिकाणी कामगार वसाहती उभ्या करण्यात आल्या असून त्यांचा वापर सुरू होता. मात्र सेक्टर ४ येथील इमारती सुरुवातीपासूनच वापराविना पडून आहेत.
मागील अनेक वर्षांपासून त्या जीर्णावस्थेत उभ्या आहेत. अखेर शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पावसामुळे त्यापैकी एक इमारत ढासळली. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नसली तरीही भविष्यातही धोक्याची शक्यता असल्याचे नगरसेविका दिव्या गायकवाड यांनी सांगितले. वापरात नसलेल्या जीर्ण इमारती जमीनदोस्त कराव्यात, यासाठी त्यांनी दोन वर्षांपूर्वी तत्कालीन पालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडेही मागणी केली होती. परंतु सदर जागा व इमारती केंद्र सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांच्याकडून प्रतिसाद मिळत नसल्याचीही खंत त्यांनी व्यक्त केली.