रेल्वे पोलिसामुळे वाचले वृद्धेचे प्राण, सानपाडा स्थानकातील घटना
By सूर्यकांत वाघमारे | Published: June 16, 2023 07:03 PM2023-06-16T19:03:32+5:302023-06-16T19:04:17+5:30
रेल्वेत चढताना गेला तोल.
नवी मुंबई : वृद्ध महिला रेल्वेत चढत असतानाच रेल्वे सुरु झाल्याने महिलेचा तोल जाऊन ती फलाटावर पडली. यावेळी ती रेल्वेखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने धावत्या रेल्वेतून उतरून महिलेला बाहेर खेचून तिचे प्राण वाचवले.
सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री ९.२४ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ठाणेकडे जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आली असता फलाटावर बसलेली एक वृद्ध महिला रेल्वेत चढत होती. मात्र तोपर्यंत रेल्वे सुरु झाल्याने वृद्धेचा तोल जाऊन त्या फलाटावर कोसळल्या.
यामध्ये त्या रेल्वे व फलाट यामधील फटीतून रुळावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी या रेल्वेतून प्रवास करणारे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी प्रसन्गसावधानता राखत धावत्या रेल्वेतून उडी मारून त्या महिलेला खेचून बाहेर काढले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळून महिलेचे प्राण वाचले आहेत. यानंतर कटारे यांनी पुढील रेल्वेत या वृद्धेला बसवून दिले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने अधिकारी वर्गाकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.