नवी मुंबई : वाशी येथे नवी मुंबई महापालिकेच्या वतीने जुने मार्केट पाडून त्याठिकाणी नव्या इमारतीचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र नव्या मार्केटच्या उभारणीनंतर मासे विक्रेत्यांचे त्याठिकाणी पुनर्वसन होणार नाही असा काहींना संशय आहे. यावरून त्यांनी जुने मार्केट पाडण्याच्या कामात हस्तक्षेप केल्याने पोलीसबळाचा वापर करावा लागला. त्यामुळे काही वेळासाठी परिसरात तणाव निर्माण झाला होता.वाशी सेक्टर १ येथील भूखंड क्रमांक ३ वरील मार्केटच्या ठिकाणी दैनंदिन बाजाराची इमारत उभारली जाणार आहे. त्यासाठी २ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. नव्या इमारतीचे काम सुरु करण्यासाठी तिथली जुनी इमारत पाडण्याचे काम मंगळवारी करण्यात आले. यावेळी त्याठिकाणी व्यवसाय करणाऱ्या मासे विक्रेत्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.
सद्यस्थितीला त्यांना इतरत्र हलवण्यात आले आहे. मात्र नवी वास्तू तयार झाल्यानंतर त्यांना पुन्हा त्याठिकाणी जागा दिली जाईल याच्या लेखी हमीची मागणी त्यांच्याकडून केली जात होती. यावरून त्याठिकाणी तणाव निर्माण झाला असता, प्रशासनाने पोलीस बळाचा वापर करून जुनी इमारत पाडण्याच्या कामातला अडथळा दूर केला. त्यानंतर सदर मार्केटची जुनी इमारत पाडून नव्या इमारतीच्या कामासाठी भूखंड मोकळा करण्यात आला. यादरम्यान पोलिसांनी आपल्याला काठीने मारहाण केल्याचाही आरोप काही मासे विक्रेत्यांनी केला आहे. त्यावरून तणाव निर्माण झाला असता, काही व्यावसायिकांनी प्रसिद्धी माध्यमांच्या कर्मचाऱ्यांवर आपला रोष काढला. छायाचित्रकार व पत्रकार यांना धक्काबुक्की करत शिवीगाळ केली. अखेर पोलिसांनी त्यांच्या तावडीतून पत्रकार व छायाचित्रकारांची सुटका केली. त्यानंतरही पाठलाग करून त्यांना पकडण्याचा प्रयत्न झाला. याप्रकरणी संबंधितांवर कारवाईची मागणी होत आहे.