वैभव गायकर, पनवेललग्न म्हटले की खर्च आलाच. मात्र सध्या लग्नसोहळ्यासाठी पैशांची जुळवाजुळव करतानाच वर-वधूच्या कुटुंबीयांच्या नाकीनऊ येत आहेत. ५०० व १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्यानंतर सर्वांचीच मोठी तारांबळ उडाली आहे. सुट्या पैशांचा तुटवडा त्यातच दुकानदारांनी जुन्या नोटा स्वीकारण्यास दिलेला नकार सर्वांचीच पंचाईत झाली आहे. लग्नाची तयारी सुरू असताना खरेदी करताना, अॅडव्हान्स देण्यासाठी सुटे पैसे जुळवताना त्यांच्या नाकीनऊ येत आहेत. खरेदीसाठी जमा केलेले लाखो रु पये पुन्हा बँकेत भरून त्या नोटा बदलण्याचे वाढीव काम या कुटुंबीयांना करावे लागत आहे. शिवाय पैसे काढण्यासाठी बँकांकडून २,००० ते ४,००० रुपयांची मर्यादा असल्याने पैशांचा तुटवडा जाणवत आहे. ५००, १००० रुपयांच्या नोटा बाद झाल्याने हॉल बुकिंगसाठी अॅडव्हान्स रक्कम जमा करताना अनेकांना अडचणी येत आहेत. तुळशी विवाहाला सोमवारपासून सुरुवात होत आहे. त्यानंतर लगेचच लग्नसराईला सुरुवात होते. यंदा २१ नोव्हेंबर हा शुभ मुहूर्त आहे. त्यामुळे पनवेल, उरण, नवी मुंबई परिसरात ५० हून अधिक कार्य या मुहूर्तावर आयोजित करण्यात आले आहेत. आयुष्यातील सर्वात मोठा सोहळा म्हणून वधू-वरापासून त्यांचे कुटुंबीय रात्रंदिवस तयारी करीत असले तरी सध्या सर्वात मोठी समस्या ही सुट्या पैशांची आहे. अगदी लहानसहान वस्तूसह सोने खरेदीवरही परिणाम झाल्याचे लग्नकार्य असलेल्या कुटुुंबीयांचे म्हणणे आहे. काही सराफांकडून जुन्या नोटा स्वीकारण्यात येत असल्या तरी त्यावर काही नवीन दर आकारले जात आहेत. लग्नकार्य तोंडावर आल्याने आणि अन्य पर्याय नसल्याने काहींनी कुठेही वाच्यता न करता दागिने खरेदी केले आहेत. लग्नसराईसाठी खरेदी तर करायची आहे, त्यासाठी बँकेतून पैसेही काढले आहेत. मात्र आता जुन्या नोटा बँकेत भरण्यातच अधिक वेळ जात आहे, त्यामुळे खरेदी बाजूला ठेवून कुटुंबातील अनेकजण सकाळीउठून बँकांबाहेर रांगेत उभे असलेले दिसत आहेत. लग्नात कॅटरर्स, बँजो-बँडवाले, मंडप डेकोरेटर्स, फोटोग्राफर्स, आदींकडून जुन्या नोटा अॅडव्हान्स म्हणून स्वीकारण्यास नकार देण्यात येत आहे. त्यामुळे पैसे असूनही खर्च करता येत नसल्याची अवस्था अनेक कुटुंबांची झाली आहे. हौसेला घालावी लागते मुरड मध्यमवर्गीय असो वा श्रीमंत प्रत्येकजण लग्नकार्यात आपापल्या पध्दतीने आणि ऐपतीप्रमाणे खर्च करतात. मात्र ५००, १००० च्या नोटा चलनातून बाद झाल्याने नाइलाजास्तव बँकेत जमा कराव्या लागत आहेत. बँकेतील रांगेत तासन्तास जात असल्याने विविध वस्तूंची खरेदी रखडली आहे. त्यामुळे कुटुंबीयांना नातेवाईक, मित्रपरिवाराचा आधार घ्यावा लागत आहे. अनेक दिवसांपासून केलेल्या तयारीवर ऐनवेळी विरजण पडल्याने अनेक कुटुंबीयांना नाइलाजास्तव हौसेला मुरड घालावी लागत आहे.
लग्नकार्यालाही जुन्या नोटांचा फटका
By admin | Published: November 12, 2016 6:42 AM