नामदेव मोरे, नवी मुंबई : आयोध्येमधील राममंदिरासाठी देशभरातून मौल्यवान वस्तू पाठविल्या जात आहेत. नवी मुंबईमधील शस्त्रसंग्राहक व अभ्यासक निलेश सकट यांनी ८० किलो वजनाचे नंदन खड्गअस्त्र तयार केले आहे. खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला असून पातीवर विष्णूचे दहा अवतार कोरण्यात आले आहेत.
आयोध्येमधील श्रीराम मंदिराच्या उद्घाटनामुळे संपुर्ण देशभर राममय वातावरण झाले आहे. प्रभु रामचंद्राच्या प्रमुख शस्त्रांमध्ये नंदनखड्गाचाही समावेश होता. यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांची भुमी असलेल्या महाराष्ट्रातून नंदनखड्ग मंदिरासाठी भेट देण्याचा निर्णय इतिहासाचे अबोल साक्षीदार संस्थेचे प्रमुख व शस्त्र संग्राहक, अभ्यासक निलेश सकट यांनी घेतला. त्यांनी यापुर्वी पालीच्या खंडोबासाठी ९८ किलो वजनाची तलवार तयार करून दिली होती. राममंदिरासाठी त्यांच्या आवडीचे नंदनखड्ग तयार केले आहे.
८० किलो वजनाचे शस्त्र सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. खड्गाच्या मुठीला सोन्याचा मुलामा देण्यात आला आहे. प्रभु रामचंद्र विष्णूचा अवतार समजला जातो. यामुळे खड्गाच्या पातीवर विष्णूच्या दहा अवतारांच्या प्रतीमा कोरण्यात आल्या आहेत. खड्गाची मुठ पुर्णपणे पितळेची असून पाते पोलादाचे आहे.
भारतीय शस्त्र परंपरेतील पटीसा प्रकारातील हे खड्ग आहे. त्यांचे वजन ८० किलो व उंची ७ फुट २ इंच आहे. यावर विष्णूच्या अवताराबरोबर पद्म, शंख, गदा, चक्र ही सुचिन्ह अंकीत करण्यात आली आहेत.
प्रतिक्रिया :
१८ वर्षापासून भारतीय शस्त्रास्त्रांचा अभ्यास करत आहे. १२ वर्षांपासून महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक राज्यात शस्त्रप्रदर्शन भरवून नागरिकांना शस्त्रांस्त्रांची माहिती देण्याचे काम करत आहे. आतापर्यंत ७०० पेक्षा जास्त प्रदर्शने भरविली आहेत. संग्रहात २ हजार शस्त्र आहेत. प्रभुरामचरणी अर्पण करण्यासाठी ८० किलो वजनाचे नंदन खड्ग तयार केले आहे-निलेश सकट, शस्त्र अभ्यासक व संग्राहक