जागतिक ट्रॉमा दिवसाच्या निमित्ताने नवी मुंबईत आपत्कालीन वैदयकीय मदतीबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2022 06:25 PM2022-10-17T18:25:32+5:302022-10-17T18:26:19+5:30
जागतिक ट्रॉमा दिवसाच्या निमित्ताने नवी मुंबईत आपत्कालीन वैदयकीय मदतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
नवी मुंबई: अपघात घडल्यानंतर आपत्कालीन स्थितीमध्ये वैदयकीय मदत मिळणे आणि गोल्डन हवर म्हणजे पहिल्या काही तासांमध्ये, वेळेत ही मदत कशी देता येईल याबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देश्याने नवी मुंबईतील मेडिकव्हर रुग्णालयाने जागतिक ट्रॉमा दिवसाच्या निमित्ताने नवी मुंबईतील कळंबोली, खारघर, सीबीडी बेलापूर, नेरुळ आणि वाशी या पाच ठिकाणी मुख्य चौकातील सिग्नलवर सोमवारी, १७ ऑक्टोबरला जनजागृतीपर उपक्रमाचे आयोजन केले होते. दरवर्षी जगभरात पाच दशलक्ष नागरिकांचा अपघातामुळे मृत्यू होतो. भारतामध्ये दरवर्षी एक दशलक्ष नागरिकांचा अपघातामध्ये मृत्यू होतो, तर २० दशलक्ष नागरिक अपघातामुळे रुग्णालयात उपचारासाठी दाखल होतात. अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण धोकादायकरित्या वाढत आहे. यामध्ये प्रामुख्याने तरुण वर्गाचा समावेश असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
वाहतूक शाखेसोबत आयोजित करण्यात आलेल्या या जनजागृतीपर उपक्रमाची सुरुवात खारघर येथील थ्री मंकी पॉईंटपासून करण्यात आली. त्यानंतर कळंबोली, सीबीडी- बेलापूर असे करत वाशीमध्ये याची सांगता झाली. यावेळी मेडिकव्हर रुग्णालयातील आपात्कालीन विभागाचे प्रमुख डॉ. अभिजित सांवत, कन्स्लटंट ब्रेन अन्ड स्पाईन सर्जन डॉ. हरीश नाईक, कन्स्लटंट ट्रॉमा अन्ड बालकांच्या अस्थिरोगावरील सर्जन डॉ. नितिश अरोरा, कन्स्लटंट आर्थोस्क्रोपिक सर्जन डॉ. शरीफ दुडकेला, जनरल अण्ड लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ. संग्राम करंदीकर आणि कन्स्लटंट स्पाईन सर्जन डॉ. बुऱ्हान सलीम या डॉक्टरांच्या टीमने अपघात घडल्यानंतर आपत्कालिन स्थितीमध्ये रुग्णाला वैदयकीय मदत कशी करावी, गोल्डन अवर म्हणजेच पहिल्या काही तासांमध्ये ही मदत मिळणे का महत्त्वाचे आहे याबाबत वाहतूक शाखेतील कर्मचारी आणि नागरिकांना मार्गदर्शन केले.
आपत्कालीन वैद्यकीय सेवेबाबत बोलताना वाशीच्या वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शहादी कदम म्हणाले की, अपघात घडल्यानंतर रुग्णाला तात्काळ वैदयकीय मदत मिळणे गरजेचे आहे. मेडिकव्हर रुग्णालयाच्या वरिष्ठ डॉक्टरांनी ही मदत देण्यासाठी केलेले मार्गदर्शन आम्हाला निश्चितच फायदेशील ठरेल. यावेळी वाशीच्या वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक बापुराव देशमुख आणि पोलीस उपनिरीक्षक अशोक कणसे हे देखील उपस्थित होते. रुग्णांना गोल्डन अवर म्हणजेच पहिल्या काही तासांमध्ये वेळेत मदत मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचविण्यास निश्चितच फायदा होतो. विशेष आणि तज्ज्ञ डॉक्टरांची टीमसोबत आपत्कालिन वैद्यकीय सेवा देण्यास आम्ही नेहमी तत्पर आहोत. यासाठी व्हेंटिलेटर, आपात्कालीन औषधे इत्यादी संसधनांनी सज्ज अशा आपात्कालिन रुग्णवाहिका आणि प्रशिक्षित पॅरामेडिकल कर्मचारी, डॉक्टरांची टीमही रुग्णालयात उपलब्ध असल्याचे नवी मुंबईच्या मेडिकव्हर रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ. सचिन गडकरीयांनी सांगितले.