ईडीच्या रडारवरील कंपनीकडून कोट्यवधींचा गंडा; एसपीव्हीएसच्या प्रमुखांवर गुन्हा
By सूर्यकांत वाघमारे | Published: February 22, 2024 09:05 AM2024-02-22T09:05:03+5:302024-02-22T09:05:27+5:30
दामदुप्पटच्या बहाण्याने राज्यभरात धुमाकूळ
नवी मुंबई : फॉरेक्स ट्रेडिंगचा बहाण्याने कोट्यवधीं रुपये गोळा करून एसपीव्हीएस कंपनीच्या प्रमुखांनी धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या प्रमुखांवर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. तर कंपनीच्या प्रमुखांनी धूम ठोकली असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. दामदुपट्टच्या बहाण्याने त्यांनी राज्यभरातून शेकडो कोटी रुपये जमा केल्याचे समोर येत आहे. मात्र सहा महिन्यांपासून कंपनीकडून मोबदला मिळायचा बंद झाल्याने अखेर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
नियम डावलून दामदुप्पटच्या नावाखाली बेकायदेशीर ठेवी गोळा करणाऱ्या एसपीव्हीएस कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. या कंपनीच्या प्रमुखांनी एजंटच्या माध्यमातून राज्यभरातील हजारो गुंतवणूकदारांकडून शेकडो कोटी रुपये खात्यावर अथवा रोखीने घेतले आहेत. मागील काही वर्षांपासून एसपीव्हीएसच्या माध्यमातून दामदुप्पट योजना चालवली जात होती. परंतु पुणेत ईडी मार्फत दाखल असलेल्या गुन्ह्यानंतर एसपीव्हीएस कंपनी देखील ईडीच्या रडारवर आली. तेंव्हापासून एपीएमसी व महापेतले कार्यालय बंद करून कंपनीचे प्रमुख सचिन डोंगरे, विकास निकम भूमिगत झाले आहेत. मात्र काही एजंटच्या ते नियमित संपर्कात आहेत. यामुळे कोपर खैरणेत राहणारे गुंतवणूकदार गणेश गोगावले व त्यांच्या सहकाऱ्यांनी पैशाच्या परताव्यासाठी तगादा लावला होता. परंतु एजंटकडून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, धमक्या याला कंटाळून अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
सुप्रिया पाटील व सतीश गावंड यांच्या प्रकरणानंतर हे प्रकरण देखील गांभीर्याने घेऊन पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त आयुक्त दीपक साकोरे यांनी "फायनान्शियल इंटेलिजन्स" विभागाला चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक सतीश जाधव, सहायक निरीक्षक अमोल शिंदे यांच्या पथकाने घणसोलीत छापा टाकून मॅनेजर भगवान कोंढाळकर, दीपाली कोंढाळकर, सागर बोराटे यांना ताब्यात घेतले. चौकशीअंती त्यांच्यावर एपीएमसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून भगवान व सागर यांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २७ फेब्रुवारी पर्यंतची पोलिस कोठडी दिली असून पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा एककडे सोपवण्यात आला आहे.
गुंतवणुकीत पोलिसही गुंतले.
सागर व इतर एजंटच्या माध्यमातून अनेक पोलिसांनी दुप्पट रक्कम मिळावी यासाठी कंपनीत लाखो रुपये गुंतवले आहेत. त्यापैकी काही हवालदारांचे "बेहिशोबी" कोटी रुपये आहेत, तर काहींनी कर्ज काढून कुटुंबियांच्या नावे रक्कम गुंतवलेली आहे. परंतु चौकशीची बला टाळण्यासाठी ते मौन धरून आहेत.
गुंतवणूकदारांना धमक्या.
अनेक गुंतवणूकदारांना तारखेवर तारीख देऊन एजंट मार्फत गप्प केले जात आहे. तर जे विरोधात जाण्याचा प्रयत्न करतील त्यांना एजंट धमकी देत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांचा आकडा हजारोच्या घरात असतानाही तक्रारदार पुढे आलेले नाहीत. त्यामुळे अधिकाधिक गुंतवणूकदारांनी तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.