ऑन द स्पॉट शाळेतच मुलाखती, पण प्रक्रिया गुलदस्त्यात; पालकांचे आंदोलन तात्पुरते स्थगित
By नारायण जाधव | Published: June 26, 2023 05:47 PM2023-06-26T17:47:59+5:302023-06-26T17:48:07+5:30
सोमवारी सकाळी थेट या शाळेतच तातडीने शिक्षकांच्या मुलाखती आयोजित करून ३० शिक्षक पुढील तीन ते चार दिवसांत दिले जातील असे आश्वासन देऊन पालकांचा रोष शांत केला.
नवी मुंबई : गेली दोन वर्षे शिक्षक देण्यास टाळाटाळ करीत असलेल्या महापालिका प्रशासनाला कोपरखैरणे येथील सीबीएसई शाळेच्या पालकांनी दिलेल्या ‘आता मुख्यालयात शाळा” या इशाऱ्यानंतर थोडे नमते घ्यावे लागले. सोमवारी सकाळी थेट या शाळेतच तातडीने शिक्षकांच्या मुलाखती आयोजित करून ३० शिक्षक पुढील तीन ते चार दिवसांत दिले जातील असे आश्वासन देऊन पालकांचा रोष शांत केला.
शाहू महाराजांची जयंती असल्याने पालकांनी शाळेबाहेर त्यांना अभिवादन करून मुलांना शाळेत सोडून घरी गेले.
मात्र, ही शिक्षक भरती पालिका प्रशासन करीत आहे की दुसरी कोणती संस्था. ही शाळा पालिका चालवणार आहे की कोणती संस्था हा प्रश्न मात्र गुलदस्त्यात आहे. कारण मुलाखतीप्रसंगी खासगी व्यक्तींची लुडबुड अधिक दिसून आली.
शिक्षकभरती निविदेला प्रतिसाद मिळत नसल्याचे कारण देऊन गेले वर्षे दीड वर्षे ही भरती रखडली होती. बुधवारी पालिका मुख्यालयात पालकांबरोबर बैठक झाली. मात्र, यात तांत्रिक अडचण असल्याने आंम्ही शिक्षक भरती लगेच करू शकत नाही, असे सांगून महापालिकेच्या इतर शाळेतील सहा शिक्षक या शाळेत पाठवले होते. मात्र, गुरुवारच्या आंदोलनाच्या पाश्व"र्वभूमीवर आमदार गणेश नाईक यांनी पालकांची बुधवारी बैठक घेतली. यात ग शाळेत तातडीने ३० शिक्षक हजर होतील असे आश्वासन दिले.
त्यानंतर पालक मुख्यालयात न जात मुलांना घेवून सकाळी आठ वाजतात शाळेत गेले. शाळेत शिक्षकांच्या मुलाखती सुरू आहेत असे सांगण्यात आल्यानंतर मुलांना पालकांनी शाळेत पाठवले. त्यानंतर दोन तास भर पावसात पालक शाळेच्या प्रवेशद्वारावर ठाण मांडून बसले. त्यानंतर माजी खासदार संजीव नाईक, माजी महापौर सागर नाईक, माजी नगरसेविका वैशाली नाईक यांच्यासह पालिकेचे उपायुक्त दत्तात्रय धनवट, शाळेचे मुख्याद्यापक मारुती गवळी, रा.फ नाईकचे मुख्याद्यापक यांच्यासह काही संस्थांचे पदाधिकारीही उपस्थित होते.
यावेळी पालिका उपायुक्त धनवट यांनी आपल्या मागणीनुसार शिक्षकभरती सुरू केली असून दोन तीन दिवसात शाळेला आवश्यक शिक्षक मिळतील असे सांगितले. तर माजी खासदार संजीव नाईक यांनी आंम्ही शाळा बंद करण्यासाठी सुरू केलेली नाही. गोरगरिबांच्या मुलांना सीबीएसई माध्यमाचे मोफत शिक्षण मिळावे म्हणून ही शाळा सुरू केली असून या शाळेत मुलांना दर्जेदार शिक्षण मिळेल असे आश्वासीत करीत आता तुंम्ही बिनधास्त घरी जा शाळा सुरळीत सुरू होईल असे सांगितल्यानंतर पालक घरी गेले.
शिक्षक भरती करतेय कोण -
आतापर्यंत तातडीने शिक्षक देणे शक्य नसल्याचे ठामपणे सांगत असताना सोमवारी थेट शाळेत शिक्षकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. एका रात्रीत हे शिक्षक उमेदवार कुठून आले असा प्रश्न आता पालकांना पडला असून ही भरती नेमके करतेय कोण असाही सवाल काही पालकांनी उपस्थित केला आहे.
पालकांना आश्वासीत करणाऱ्या त्या दोन महिला कोण -
यावेळी पालकांना दोन महिलांनी आश्वासीत केले. त्यांनी आमचा २० ते २५ वर्षे सीबीएसई माध्यमाशी संबंधित अनुभव असून आता तुंम्ही काळजी करू नको. चांगल्या दर्जाचे शिक्षक तुंम्हाला मिळतील. दोन ते तीन दिवसात शाळा सुरळीत सुरू होईल. आता तुमची मुलं आमची जबाबदारी आहे. तुंम्ही निर्धास्त राहा, असे सांगितले. मात्र त्या दोन महिला कोण अशी चर्चा त्यानंतर पालकांमध्ये होती.
शाळा चालवणार कोण -
आज शाळेत एका सामजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या मुलाखती घेतल्या. पण ही संस्था कोण असा प्रश्न उपस्थित होत असताना या शाळेचे संपूर्ण व्यवस्थापनच एका संस्थेच्या हाती देण्याच्या हालाचाली सुरू आहेत. या शाळेतील पूर्वीच्या शिक्षक मुख्याद्यापकांसह सर्व स्टापला गरज पडल्यास तुमची दुसऱ्या शाळेत बदली केली जाईल असे संकेतही देण्यात आले आहत. त्यामुळे गेली दोन वर्षे शिक्षक नसताना कष्ट घेणाऱ्या पालिकेच्या त्या शिक्षकांमध्येही अस्वस्थतता आहे.