तिसऱ्या दिवशी एमजेपीला आली जाग; शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र
By वैभव गायकर | Published: June 14, 2023 07:07 PM2023-06-14T19:07:55+5:302023-06-14T19:08:28+5:30
एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावा शेवा पानीपुरवठा योजने अंतर्गत काम करणारे जलसेवक दि.12 रोजी पासुन बेलापुर याठिकाणी कोंकण भवन परिसरात आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले. मात्र तिसऱ्या दिवशी एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत या उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत दि.14 रोजी चारही उपोषण कर्त्यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत.
विष्णू पवार, जनार्दन भोईर, विठ्ठल वनासरे,गोणाप्पा विश्वकर्मा हे चार जलसेवक उपोषणाला बसले आहेत.कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या,चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेने सोयी सुविधा व वेतन द्या, 2009 ते 2023 पर्यंत फरकाची रक्कम त्वरित अदा करावी ,पीएफ ची थकीत रक्कम त्वरित अदा करावी, ग्रॅच्युटी, इपीएफ त्वरित अदा करावी या महत्वपूर्ण मागणीसाठी हे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. दि.14 रोजी एमजेपिचे कार्यकारी अभियंता व्ही के सूर्यवंशी यांनी आपल्या सहीचे पत्र या आंदोलन कर्त्यांना दिले.शासन स्तरावर मागण्या संदर्भात 15 दिवसात प्रस्ताव सादर करू असे आश्वासन या पत्रात देन्यात आलेले आले.मात्र 30 वर्षात अशी अनेक आश्वासने आम्ही ऐकली यापुढे आश्वासने नको कृती हवी अशी भूमिका या आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.दरम्यान तीन दिवस उलटत चालल्याने 50 वर्षीय या आंदोलन कर्त्यांची तब्बेत ढासळत चालली आहे.
स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींची पाठ
पनवेल उरण परिसरात लाखो लोकांना एमजेपीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या दरम्यान कुठेही काही समस्या उद्भवल्यास हे कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र तीन दिवस उलटून पनवेल उरण चे आमदार असोत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही.हि आमच्यासाठी शोकांतिका असल्याचे जनार्धन भोईर या उपोषण कर्त्यांनी सांगितले.