नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकाने ६ लाखाचे मेफेड्रॉन ड्रग्स जप्त केले आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो मुंब्रा येथे राहणारा आहे. शिरढोण येथे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे.
मुंबई गोवा मार्गावर शिरढोण येथे अमली पदार्थाची तष्करी होणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक नीरज चौधरी यांनी सहायक निरीक्षक निलेश धुमाळ, उपनिरीक्षक कुलदीप मोरे यांचे पथक केले होते. या पथकाने रविवारी संध्याकाळी शिरढोण येथे गोवा मार्गालगत सापळा रचला होता. यावेळी तिथे आलेल्या एकावर संशय आल्याने त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याकडे ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन (एमडी) हा ड्रग्स आढळून आला. शादाब सय्यद (४२) असे त्याचे नाव असून तो मुंब्रा येथे राहणारा आहे.
त्याने हे ड्रग्स बदलापूर मधील एकाकडून घेतले असल्याचे सांगितले. तसेच ठरलेल्या एका ग्राहकाला ते पुरवण्यासाठी तो शिरढोण येथे आला होता. त्यापूर्वीच अमली पदार्थ विरोधी पथकाने त्याच्यावर कारवाई करून हे ड्रग्स जप्त केले. याप्रकरणी त्याच्यावर पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.