अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली असून, हा रस्ता वाहतुकीस धोकादायक बनला आहे. यासाठी अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या क्षेत्रातील अधिकारी जबाबदार आहेत, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारी जनहित याचिका रायगड जिल्हा न्यायालयात गेल्या २० आॅक्टोबर, २०१६ रोजी दाखल केली होती. त्यानंतर काही रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करण्यात आली. तर गेल्या तीन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील एकूण ११ रस्त्यांकरिता १ कोटी ७८ लाख रुपयांचा निधी राज्य शासनाकडून मंजूर केल्याची माहिती अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही.बी.पाटील यांनी दिल्याचे जनहित याचिका दाखल करणारे येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजय यशवंत उपाध्ये यांनी ‘लोकमत’ला सांगितले.राज्य शासनाकडून मंजूर झालेल्या १ कोटी ७८ लाख रुपयांच्या निधीतून दुरुस्त होणाऱ्या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण करण्यात येणार आहेत. या रस्त्यांमध्ये अलिबागमधील वायशेत ते रेवस रस्ता, श्रीवर्धन-म्हसळा-लोणेरे(रा.मा.९९) रस्ता, अलिबाग ते रोहा वावे (रा.मा. ९१), पोयनाड ते नागोठणे ( रा.मा. ८७), इंदापूर-पाचाड-महाड-करंजाडी-दापोली (रा.मा. ९७), पाली ते पाटणूस (रा.मा. ९४), कर्जत-मुरबाड ते जव्हार (रा.मा. ७६), गव्हाणफाटा-चिरनेर-सावरोली (रा.मा. १०४), विळे भागाड व तळोजा औद्योगिक क्षेत्र रस्त्यांची सुधारणा, अष्टविनायक श्री क्षेत्र पाली व श्री क्षेत्र महाड रस्त्यांची सुधारणा, रायगड जिल्ह्यातील पर्यटन व ऐतिहासिक स्थळाला जोडणाऱ्या रस्त्यांतर्गत रायगड किल्ला रस्त्याचा सामावेश आहे.सामाजिक कार्यकर्ते अॅड. अजय उपाध्ये आणि किशोर चंद्रकांत अनुभवणे यांनी रस्त्यांच्या दुरवस्थेच्या पार्श्वभूमीवर अलिबाग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे माहितीच्या अधिकारात मागितलेल्या माहितीत ‘रस्ते बांधणी प्रक्रिया अपूर्ण’ राहिल्याचे अहवालात स्पष्ट झाले. त्या अहवालाच्या अनुषंगाने रस्त्यांच्या दुरवस्थेस जबाबदार धरून रायगड जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक या सात जणांना प्रतिवादी करून त्यांच्याविरुद्ध येथील जिल्हा न्यायालयात दावा दाखल केला आहे. कार्यकारी अभियंता व्ही. बी. पाटील यांनी न्यायालयात हजर राहून आपली कैफियत मांडली. (विशेष प्रतिनिधी)
अकरा रस्त्यांसाठीएक कोटींचा निधी
By admin | Published: February 11, 2017 4:23 AM