तलाठ्यांचे एक दिवसीय आंदोलन, पनवेल परिसरातील नागरिकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:41 AM2017-12-03T02:41:54+5:302017-12-03T02:42:05+5:30
पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.
पनवेल : पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील दोन तलाठ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल उचित कारवाई व्हावी, यासंदर्भातील निवेदन पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना देण्यात आले.
वाढत्या विकासकामामुळे अवैध गौण खनिज पकड मोहिमा पनवेल तालुक्यात नेहमीच होतात, तलाठ्यावर कारवाईदरम्यान होणारे हल्ले ही नवीन बाब राहिली नाही ये, त्यामुळे कारवाईदरम्यान तलाठ्यांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे तलाठीवर्गात भीतीचे वातावरण वाढत आहे. आताच घडलेल्या नोव्हेंबरमधील डबर गौणखनिज पकड मोहिमेत पनवेल तालुक्यातील साई येथे कार्यरत असणारे पठाण व शिरवली येथे लाटे या तलाठ्यांना झालेल्या मारहाणीतील त्यात दोषी असणाºया सर्व आरोपींना मुदतीत अटक न केल्यामुळे जिल्हा रायगड तलाठी संघ आंदोलनात उतरणार, असा इशारा तलाठी संघटनांनी दिला होता.
या संदर्भात पत्रही रायगड जिल्हा तलाठी संघ व सर्व कार्यकारिणी सदस्य, उपविभाग अध्यक्ष, तालुका अध्यक्ष/सचिव यांना देण्यात आले होते, तसेच रायगड जिल्हा तलाठी संघाची विशेष सभा ही रविवार, दि. ३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वा. संतोष जांभळे (अध्यक्ष रायगड जिल्हा तलाठी संघ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. पनवेल येथील तलाठीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारले.