लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : जीएसटीमधून जीवनावश्यक वस्तू वगळाव्यात या मागणीसाठी व्यापाऱ्यांनी गुरुवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंद घोषित केला आहे. नवी मुंबईतील व्यापारी देखील या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे नवी मुंबई मर्चन्ट्स चेंबरच्या वतीने कळवण्यात आले आहे. ९ जून रोजी पुणे येथे व्यापाऱ्यांच्या संघटनांमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.शासनाने अन्नधान्य, पीठ, रवा, मैदा आदींवर जीएसटी आकारलेला नाही. मात्र याच वस्तू ट्रेडमार्कमध्ये असल्याने त्यावर ५ टक्के जीएसटी लागणार आहे. या वस्तू जीवनावश्यक वस्तूंमध्ये मोडत असल्यामुळे त्या जीएसटीमुक्त असाव्यात, शिवाय मिरची, हळद, चिंच, खजुर, मणुका, सुटा चहा अन्य व्हॅटमुक्त असलेल्या वस्तू देखील जीएसटीमुक्त असाव्यात अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे. याकरिता ९ जून रोजी पुणे येथे राज्यातील व्यापारी संघटनांची बैठक संपन्न झाली. त्यामध्ये झालेल्या चर्चेअंती जीवनावश्यक वस्तू जीएसटीमधून वगळाव्यात या मागणीकरिता बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार गुरुवारी १५ जून रोजी राज्यव्यापी एकदिवसीय मार्केट बंद आंदोलन केले जाणार असल्याचे नवी मुंबई मर्चन्ट्स चेंबरचे अध्यक्ष कीर्ती राणा यांनी सांगितले आहे. तर हा बंद यशस्वी करण्यासाठी व्यापाऱ्यांनी त्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
गुरुवारी व्यापाऱ्यांचा एकदिवसीय बंद
By admin | Published: June 14, 2017 3:16 AM