एपीएमसीमधील मसाला मार्केटमध्ये व्यापाऱ्यांचा एकदिवसीय कडकडीत बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2020 01:49 AM2020-08-26T01:49:57+5:302020-08-26T01:50:11+5:30
संपूर्ण नियमनमुक्तीची मागणी; धान्य मार्केटमधील व्यापारी संघटनांचा सहभाग
नवी मुंबई : केंद्र शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी व सर्व कृषी व्यापार नियमनमुक्त करावा, या मागणीसाठी व्यापारी संघटनांनी मंगळवारी एकदिवसीय राज्यव्यापी बंदचे आयोजन केले होते. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या धान्य व मसाला मार्केटमधील व्यापारी या आंदोलनात सहभागी झाले होते.
केंद्राने एपीएमसीबाहेर व्यापार करण्यावरील निर्बंध उठवले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र मार्के ट आवारापुरते मर्यादित केले आहे. यामुळे भविष्यात एपीएमसीमधील व्यापार ठप्प होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्केटमधील कृषी व्यापारही नियमनमुक्त करावा, अशी मागणी व्यापारी संघटनांनी केली आहे. चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्री अॅण्ड ट्रेड या संघटनेच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निवेदन देण्यात आले होते.
दिवसभर दोन्ही मार्केट बंद होते. भाजीपाला, फळ व कांदा-बटाटा मार्केटला बंदमधून वगळले होते. राज्यातील अनेक व्यापाऱ्यांसह मुंबईबाहेरील अनेक मार्केटमधील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते.
कृषी मालाच्या व्यापारासाठी सर्वांना समान नियम हवेत. एपीएमसीबाहेर नियमनमुक्ती व एपीएमसीमध्ये नियमन लावणे योग्य नाही. संपूर्ण नियमनमुक्तीचा निर्णय घेऊन सर्वांना समान न्याय मिळावा यासाठी आंदोलन केले होते. - कीर्ती राणा, अध्यक्ष, नवी मुंबई मर्चंट चेंबर
शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आयोजित केलेल्या बंदमध्ये धान्य मार्केटमधील व्यापारीही सहभागी झाले होते. शासनाने या आंदोलनाची दखल घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा. - नीलेश वीरा, संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती
व्यापाºयांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसाचे राज्यव्यापी आंदोलन आयोजित केले होते. मुंबईसह राज्यातील अनेक मार्के ट बंद ठेवण्यात आली होती. शासनाने दखल घेतली नाही तर पुन्हा तीव्र आंदोलन केले जाईल. - मोहन गुरनानी, अध्यक्ष - चेंबर आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेड