नवी मुंबई: अल्पवयीन मुलांच्या दोन गटातील मारहाणीत एकाचा मृत्यू होऊन दुसरा गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी दुपारी तुर्भे येथे हा प्रकार घडला आहे. मात्र त्यांच्यात वाद नेमका कोणत्या कारणाने झाला हे समोर आले नसून एपीएमसी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
तुर्भे येथील मैदानात बुधवारी दुपारच्या सुमारास हि घटना घडली. परिसरात राहणाऱ्या बारावीसह इतर वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दोन गटात वाद झाला होता. शाळेत झालेला वाद शाळेबाहेर पुन्हा उफाळून आला. यामध्ये एका गटाच्या १० ते १५ विद्यार्थ्यांनी दोघांना जबर मारहाण केली. त्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आदित्य भोसले (१७) याचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र देवाण ठाकूर हा जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेनंतर मृत व जखमी विद्यार्थ्यांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.
त्यानुसार पोलिसांनी काही संशयित अल्पवयीन मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेत आहेत. मात्र त्यांच्यात नेमका कोणत्या कारणांनी वाद झाला हे संध्याकाळ पर्यंत समोर आलं नाही. तर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. या घटनेवरून अल्पवयीन मुलांमध्ये शाळांबाहेर होणाऱ्या वादांचे गंभीर परिणाम समोर आले आहेत. वाशीसह इतर परिसरातील काही शाळांबाहेर शाळकरी मुलांच्या गटागटातील भांडणाचे प्रकार सातत्याने घडत आहेत. त्यावरून पालकांचे देखील वाद होत आहेत. मात्र शाळा प्रशासनांकडून गांभीर्य घेतले जात नसल्याने शहरातील शाळकरी मुले गुन्हेगारीच्या दिशेने पाऊल टाकत असल्याचे समोर येत आहे.