समुद्रकिनारी कायमस्वरूपी नगर परिषदेचा एक कर्मचारी
By Admin | Published: February 4, 2016 02:38 AM2016-02-04T02:38:34+5:302016-02-04T02:38:34+5:30
पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रसारमाध्यमांकडून मुरुड नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले.
नांदगाव : पुण्यातील १४ विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने प्रसारमाध्यमांकडून मुरुड नगर परिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढण्यात आले. शहरातील या समुद्रकिनारी जीवरक्षक तसेच गोवा धर्तीवर असणारे मनोरे तसेच दुर्बीण नसल्याची टीका चोहोबाजूने करण्यात आली होती. यासंदर्भात मुरुड नगर परिषदेमार्फत तातडीने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. समुद्रातील जो धोकादायक स्पॉट आहे तिथे पर्यटकांनी पोहण्यास जाऊ नये, यासाठी मुरुड नगर परिषदेचा एक कर्मचारी कायमस्वरूपी नियुक्त करण्यात येऊन त्याच्या जोडीला होमगार्ड पोलीसही नियुक्त करणार असल्याची माहिती मुख्याधिकारी वंदना गुळवे यांनी दिली.
नगरसेवक संदीप पाटील म्हणाले की, मुरुड समुद्रकिनारी अशा दुर्दैवी घटना घडू नयेत यासाठी लवकरच स्थानिकांसह पत्रकारांना सोबत घेऊन त्यावर विचारविनिमय करून ठोस उपाययोजना करणार आहोत. ग्रोऐन्स बंधाऱ्यासाठी सर्व नगरसेवक प्रस्ताव तयार करून पाठपुरावा करू, असेही त्यांनी सांगितले. मुरुड शहरात पर्यटकांनी प्रवेश करताच धोकादायक स्पॉटचे चित्र व येथे पोहू नये, अशा संदेशाचे पत्रक वाटण्याची संकल्पना महेश भगत यांनी व्यक्त केली. डिजिटल बॅनरद्वारे जनजागृतीचा संकल्प जाहीर केला. मुरुड नगर परिषद कायमस्वरूपी जीवरक्षक नेमू शकत नाही. कारण ही पदे मंजूर नाहीत. गणपती विसर्जन, नवरात्रोत्सव काळात हंगामी स्वरूपात जीवरक्षक नेमले जातात, अशी माहिती गुळवे यांनी दिली. स्वयंसिध्द लॉजच्या मागील समुद्र धोकादायक आहे. त्या ठिकाणी फलक लावणार असून, प्रतिबंधित भाग म्हणून मेरीटाइम बोर्ड व नगर परिषदेकडून प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
नगराध्यक्ष अशोक लुमाल, नगरसेवक महेश भगत, संदीप पाटील, रहिब कबले, संजय गुंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.(वार्ताहर)