शंभर कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने विकासकाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2019 11:49 PM2019-10-29T23:49:53+5:302019-10-29T23:50:20+5:30
खारघर पोलिसांत गुन्हा दाखल : ३१ लाख ५0 हजार रुपयांचा घातला गंडा
पनवेल : एका बांधकाम व्यवसायिकाला बांधकाम प्रकल्पासाठी १00 कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची बतावणी करून त्यांची ३१ लाख ५0 हजार रुपयांची फणवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सदर विकासकाने केलेल्या तक्रारीनुसार दोघांच्या विरोधात खारघर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नरेश नानकचंद आग्रवाल यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे. त्यांच्या पुणे येथे आग्रवाल इंटरप्राइजेस व नरेश बिल्डकन प्रा.लि. या नावे दोन कंपन्या आहेत. दोन वर्षांपूर्वी ते खारघर येथे आले असता त्यांना सूरज नावाचा इसम भेटला. बांधकाम प्रकल्पासाठी कर्ज हवे असल्यास आपण ते मिळवून देऊ, असे सूरज याने नरेश यांना सांगितले होते. तसेच त्याने नरेश यांची पर्याय फायनान्सचे मालक मिलिंद सदाशिव लवाटे (रा. कांदिवली, मुंबई) याच्याशी ओळख करून दिली. त्यानंतर काही दिवसांनी नरेश आग्रवाल यांनी मिलिंद लवाटे याच्या कांदिवली येथील आॅफिसमध्ये जाऊन कर्जाबाबत चर्चा केली. त्यानुसार लवाटे याने आग्रवाल यांना शंभर कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याची तयारी दर्शविली. त्यासाठी १० लाख रुपयांचा खर्च येईल असेही सांगितले. आग्रवाल यांनी आरटीजीएसच्या माध्यमातून मिलिंद लवाटे याच्या पर्याय फायनान्स कंपनीच्या खात्यात १0 लाख ५0 हजार रुपये ट्रान्सफर केले. परंतु दोन महिन्यांनंतर कर्जाच्या कामात अडचणी येत असल्याची बतावणी करून लवाटे याने आग्रवाल यांच्याकडून आणखी १५ लाख रुपये उकळले. त्यानंतर मिलिंद लवाटे याने कर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आग्रवाल यांना बोलावून घेतले आणि आणखी सहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार आग्रवाल यांनी ही रक्कमसुद्धा लवाटेला दिली. त्यानंतर मात्र लवाटे आणि सूरज यांचा संपर्क बंद झाला. अग्रवाल यांनी त्यांना वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी खारघर पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात तक्रार दाखल केली.