जयंत धुळप / अलिबागमावळत्या आर्थिक वर्षातील १०० टक्के इष्टांकपूर्ती करून, तब्बल २१५ कोटी १२ लाख ६४ हजार रुपयांचा महसूल सरकारी तिजोरीत जमा करून नवआर्थिक वर्षाच्या स्वागताकरिता रायगड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्ह्याच्या विकासकामांकरिता प्राप्त शासकीय निधी १०० टक्के वितरीत करून प्रत्यक्षात योजनापूर्ती इष्टांक साध्य करण्यात कोकण महसूल विभागात प्रथम क्रमांक संपादन करण्यात यश मिळविलेल्या रायगड जिल्हा प्रशासनाने या निमित्ताने १०० टक्के महसूल वसुली इष्टांक साध्य करण्यात देखील कोकण महसूल विभागात प्रथम क्रमांक संपादन केला आहे.मावळत्या आर्थिक वर्षात महसूल इष्टांक साध्य करण्यात मोठी अडचण गौण खनिजअंतर्गत येणाऱ्या ‘रेती उत्खनन’ या माध्यमातून सुमारे १५० कोटी रुपयांचा महसूल रायगड जिल्हा प्रशासनास प्राप्त होत असे. मात्र गतआर्थिक वर्षात विविध खाड्या व नद्यांमधील रेती उत्खननाचे लिलाव होऊ शकले नाहीत. परिणामी महसुलाचा मोठा स्रोत बंद झाला होता. अशा परिस्थितीत रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले यांनी बेकायदा रेती उत्खनन, बेकायदा रेती वाहतूक यावर विशेष लक्ष केंद्रित करून, जिल्ह्यात विविध ठिकाणी चेकपोस्ट उभारून ही बेकायदा रेती जप्त करून त्यामाध्यमातून उपलब्ध दंडाच्या रकमेतून महसूल साध्यतेचे नियोजन केल्याने,महसूल इष्टांक साध्यतेत मोठे यशप्राप्त झाल्याची माहिती रायगडचे निवासी उपजिल्हाधिकारी किरण पाणबुडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.जिल्ह्याचा एकूण महसूल इष्टांक २१३ कोटी ४७ लाख ४७ हजार रुपये होता, तो प्रत्यक्षात २१५ कोटी १२ लाख ६४ हजार रुपये इतका साध्य करण्यात आला आहे. या एकूण महसूल इष्टांकामध्ये जमीन महसुलाचा इष्टांक ८५ कोटी ९७ लाख ४७ हजार रुपये, गौण खनिज महसूल इष्टांक ११५ कोटी रुपये, करमणूक कराच्या माध्यमातून उपलब्ध महसुलाचा इष्टांक १२ कोटी ५० लाख रुपये होता. हे तीनही इष्टांक १०० टक्के साध्य करण्यात आले आहेत.डिजिटलायझेशनच्या चौथ्या टप्प्याचे काम अत्यंत प्रभावी केले गेले, परिणामी खरे केबल जोडणीधारक महसूल कराच्या कक्षेत आले. त्यासाठी अधिक करमणूक कर वसुली अधिक प्रमाणात होऊ शकली. यासाठी अलिबाग व पनवेल तहसील कार्यालयांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. रोजगार हमी अधिभार व शिक्षणकर अधिभार वसुली देखील १०० टक्के करण्यात आली आहे.इष्टांकात जिल्हाधिकारी कार्यालय आघाडीवररायगड जिल्ह्यातील पनवेल, कर्जत, अलिबाग, पेण, माणगाव, रोहा, महाड आणि श्रीवर्धन असे आठ महसूल उप (प्रांत)विभाग, १५ तालुके आणि जिल्हाधिकारी कार्यालय या सर्वांनी इष्टांक साध्यतेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने १६५.२१ टक्के तर पनवेल उप विभाग १०४.५४ टक्के, पेण उप विभाग १०३.०८टक्के,रोहा उप विभाग ७६.९३टक्के,श्रीवर्धन उप विभाग ६५.१९टक्के माणगाव उप विभाग ६१.५० टक्के, कर्जत उप विभाग ६०.५३टक्के,अलिबाग उप विभाग ५९.३० टक्के, महाड उप विभाग ४२.५३टक्के इष्टांक साध्य केला आहे.पेण तहसील कार्यालय आघाडीवरजिल्ह्यातील १५ तहसीलदार कार्यालयामध्ये पेण १४२.३४टक्के, पनवेल१२६.९५ टक्के, सुधागड-पाली ८५.६३ टक्के, तळा ७५.५७टक्के, श्रीवर्धन ७४.७३टक्के, कर्जत ७३.८०टक्के, महाड ७३.०८ टक्के, म्हसळा ७२.३८ टक्के, माणगाव ६९.६०टक्के, रोहा ६९.२७टक्के, मुरुड ६३.८५टक्के, उरण ५७.११टक्के, अलिबाग ५७.५५टक्के, पोलादपूर ५७.१२टक्के, खालापूर ५५.३९टक्के, माथेरान २८.६९टक्के इष्टांक साध्य केला आहे.
शंभर टक्के महसूल वसुली इष्टांक साध्य
By admin | Published: April 01, 2017 6:17 AM