नवी मुंबई : टिक-टॉकवर व्हिडीओ बनवण्याच्या वादातून झालेल्या हाणामारीत एक जण जखमी झाला. या प्रकरणी दोघांना गुरुवारी अटक करण्यात आली असून ते नेरुळचे राहणारे आहेत.
सध्या तरुणांमधील टिक-टॉक व्हिडीओची प्रचंड क्रेझ आहे. टिक-टॉकच्या माध्यमातून सोशल मीडियावर झळकण्यासाठी अनेकदा जीवघेणे स्टंटही केले जातात. नेरूळमध्ये राहणारे भरत शर्मा व वाशीचा रेहान खान एकत्र टिक-टॉक व्हिडीओ बनवायचे. त्यामध्ये भरत वेगवेगळी शक्कल वापरून व्हिडीओ लोकप्रिय कसा होईल, यासाठी प्रयत्न करायचा. मात्र काही दिवसांपूर्वी रेहान याने भरतपासून वेगळे होऊन स्वत:चे व्हिडीओ बनवायला सुरुवात केली. दोघांच्याही व्हिडीओंना मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांच्यात स्पर्धा सुरू झाली आणि वाद वाढले. वाद मिटविण्यासाठी बुधवारी रात्री भरतच्या घरी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये रेहान मित्रांसह उपस्थित होता. मात्र या ठिकाणीही वाद झाल्याने भरत व त्याच्या वडिलांनी स्क्रू-ड्राइव्हरने रेहानवर हल्ला केला. यामध्ये तो जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, भरत व त्याचे वडील राजकुमार शर्मा यांना अटक केल्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. न्यायालयाने त्यांना ३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.