देशात एक लाख परिचारिकांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2016 02:33 AM2016-05-13T02:33:46+5:302016-05-13T02:33:46+5:30
आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे.
मुंबई: आरोग्य क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असल्यामुळे आयुर्मान वाढण्यास मदत होत आहे, पण रुग्णांची शुश्रूषा करणाऱ्या परिचारिकांवर दिवसेंदिवस कामाचे ओझे वाढतच आहे. देशातील परिचारिकांची संख्या सुमारे १ लाख असून, आरोग्य क्षेत्रात अजूनही १ लाख परिचारिकांची आवश्यकता आहे. सध्या सुरू असलेल्या परिचारिकांच्या अभ्यासक्रमाच्या जागांचा विचार केल्यास १ लाख परिचारिका तयार होण्यास तब्बल १० वर्षांचा कालावधी लागेल, असे मत महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे अध्यक्ष रामलिंग माळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरवर्षी १६ हजार ५०० परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करतात. हा वेग कमी आहे. त्यामुळे परिचारिकांची गरज पूर्ण करण्यासाठी मोठा काळ जावा लागणार आहे. गेल्या काही वर्षांत परिचारिका क्षेत्रात असलेल्या विविध संधींचा विचार होताना दिसत नाही. परिचारिका क्षेत्राविषयी मर्यादित माहिती मिळत असल्यामुळे या क्षेत्रात येणाऱ्यांची संख्या रोडावली आहे. मात्र, हे सत्य नाही. परिचारिका अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना भविष्यात अनेक संधी आहेत. त्यांनी स्पेशलाइज अभ्यासक्रम पूर्ण केल्यास त्यांना चांगल्या संधी मिळू शकतात, असेही माळी यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या सरचिटणीस कमल वायकोळ यांनीदेखील परिचारिकांची संख्या कमी होत असल्यामुळे परिचारिकांवर पडणाऱ्या ताणाविषयी सांगितले. राज्यातील जिल्हा रुग्णालयात परिचारिकांची संख्या कमी आहे.
त्यातच काही वर्षांपूर्वी ‘सिस्टर इन्चार्ज’ हे पद रद्द केले. राज्यातील ७५० पदे रद्द झाली. त्यामुळे रुग्णालयातील वरिष्ठ परिचारिकेला ‘सिस्टर इन्चार्ज’चे म्हणजे प्रशासकीय कामकाजासह रुग्णसेवा अशी दोन्ही कामे सांभाळावी लागत आहेत. सध्या राज्यातील जिल्हा आणि उपजिल्हा रुग्णालयात १३ हजार परिचारिका कार्यरत आहेत. कौन्सिलच्या गुणोत्तरानुसार ९ रुग्णांमागे एक परिचारिका कार्यरत हवी, पण हे गुणोत्तर पूर्ण होत नाही.
एका परिचारिकेवर कामाच्या अतिरिक्त ताणामुळे त्याचा परिणाम तिच्या कुटुंबावरदेखील होतो. रुग्णसेवा करताना परिचारिकेना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. रुग्णांच्या औषधांची वेळ सांभाळत त्यांची शुश्रूषा करावी लागते. त्याच इतर कामाकडेही लक्ष द्यावे लागते. या सगळ््या कामाच्या ताणाचा परिणाम त्यांच्या कुटुंबावर होत आहे. त्यामुळे परिचारिकांची पदे वाढवावीत, ती भरली जावीत हे आपले प्रमुख म्हणणे असल्याचे वायकोळ यांनी स्पष्ट केले.