नवी मुंबई : नागरी सहयोगातून शहरात एक लाख वृक्षलागवडीचा संकल्प महापालिकेने केला आहे. महापौर जयवंत सुतार यांनी वनमहोत्सवानिमित्ताने वृक्षलागवडी वेळी त्याची घोषणा केली. तर नागरिकांनीही हरित नवी मुंबईचा संकल्प करून वृक्ष संवर्धनाची सवय जोपासण्याचा संदेश दिला.स्वच्छतेच्या बाबतीत नवी मुंबईचा नावलौकिक होत असतानाच हे शहर वृक्ष संवर्धनातही अव्वल ठरावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. त्याकरिता नागरिकांच्या सहयोगाने नियोजनबद्धरीत्या शहरात या पावसाळ्यात एक लाखाहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याचे महापौर जयवंत सुतार यांनी सांगितले. वनमहोत्सवानिमित्ताने नेरुळ व पावणे एमआयडीसी येथे वृक्षलागवडीप्रसंगी ते प्रामुख्याने उपस्थित होते. या प्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, पालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., सभागृहनेते रवींद्र इथापे, परिवहन सभापती प्रदीप गवस, नगरसेविका नेत्रा शिर्के, कविता आगोंडे, अनीता मानवतकर आदी उपस्थित होते.नागरिकांनी त्यांचे जन्मदिवस, लग्नाचे दिवस याशिवाय नातेवाइकांचे पुण्यस्मरण याच्या निमित्ताने महानगरपालिकेच्या स्मृतिवनात वृक्षरोपण करून त्या वृक्षांची जपणूक करण्याची सवय लावून घ्यावी, असेही आवाहन महापौरांनी केले.
पालिका शहरात लावणार एक लाख झाडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 3:18 AM