प्रॉपर्टी कार्डबाबत पळस्पेवासियांना एक महिन्याचे आश्वासन; सिडकोला आली जाग
By वैभव गायकर | Published: October 19, 2023 04:35 PM2023-10-19T16:35:27+5:302023-10-19T16:36:00+5:30
सिडकोने पुन्हा एकदा नव्याने एका महिन्याचे आश्वासन पळस्पे ग्रामस्थांना दिले आहे.
पनवेल:गावठाण विस्ताराच्या मागणीसाठी जुन महिन्यात पळस्पे ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण पुकारले होते.हे उपोषण सोडवताना सिडको प्रशासनातील अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना तीन महिन्यात प्रॉपर्टी कार्ड देण्याची प्रक्रिया पार पाडली जाईल असे आश्वासन दिले होते.मात्र चार महिने उलटूनही प्रॉपर्टी कार्डची प्रक्रिया सुरु केली नसल्याने दि.19 रोजी सिडको सामोर ग्रामस्थांनी आत्मदहनाचा ईशारा दिल्यानंतर सिडकोने पुन्हा एकदा नव्याने एका महिन्याचे आश्वासन पळस्पे ग्रामस्थांना दिले आहे.
सिडको (नैना) चे मुख्य भूमी व भूमापन अधिकारी तथा उपसचिव यांनी नव्याने लेखी पत्र देऊन भूमी अभिलेख विभाग व पनवेल तहसीलदार यांच्यशी समन्वय करून संयुक्त सर्वेक्षणाची कार्यवाही साधारणपणे एक महिन्यात सुरु करण्यात येईल असे आश्वासन गावठाण विस्तार हक्क समितीचे अध्यक्ष अनिल ढवळे यांना दिले आहे.सिडकोच्या नव्याने दिलेल्या आश्वासनामुळे पुन्हा एक नवीन डेडलाईन सिडकोने पळस्पे ग्रामस्थांना दिली आहे.सिडकोनेच दिलेले पहिले आश्वासन फोल ठरल्यानंतर सिडकोच्या नवीन आश्वासनाची पूर्तता करते का ? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.